भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यानंतर आता खेळाडू मायदेशी परतले आहेत. क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासुद्धा त्याच्या घरी परतला असून त्याने आपल्या वडिलांना आश्चर्याचा धक्काच दिला. सोशल मीडियावर हार्दिकने याविषयीचा एक व्हिडिओही पोस्ट केला असून, तो व्हिडिओ क्रीडाविश्वात आणि एकंदर सोशल मीडिया वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

हार्दिक ज्यावेळी आपल्या घरी परतला तेव्हा तो थेट आपल्या वडिलांच्या खोलीत गेला. जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर तो आपल्या वडिलांना भेटणार होता. हार्दिक वडिलांच्या खोलीत गेला तेव्हा ते झोपलेले होते, पण त्यांना त्याने जेव्हा उठवलं तेव्हा मात्र त्या खोलीत फक्त आणि फक्त आनंदच पाहायला मिळाला. आपल्या मुलाला असा अचानक समोर पाहून वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून हार्दिकही भावूक झाला असणार यात शंका नाही.

वाचा : सर्वत्र व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मीम्सविषयी राधिकाची प्रतिक्रिया वाचली का?

दरम्यान, वडिलांना त्याने दिलेल्या या सरप्राईजचा व्हिडिओ पोस्ट करताच कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच या नात्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. खेळाच्या निमित्ताने वारंवार आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या हार्दिकचं त्याच्या वडिलांसोबत असणारं नातं आणि त्या नात्याचे बंध याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहून या सुरेख नात्याचा अनेकांना नेहमीच हेवा वाटतो. त्यातच आता हा व्हिडिओ म्हणजे ‘चेरी ऑन द केक’ असं म्हणायला हरकत नाही.