गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील गुंदासुरा गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी दुपारी गावातील एका शेतातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. पण, त्यानंतर जी माहिती समोर आली त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. मृत व्यक्ती चार दिवसांपूर्वी याच गावातील एका तरुणीला भेटण्यासाठी आला होता. त्याचवेळी तरुणीच्या भावाने बघितलं म्हणून तो पळाला आणि पळताना गडबडीत शेतातील एका विहिरीत पडला व त्याचा मृत्यू झाला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, उज्जैन सिंह गौतम (वय-26) असं मृत व्यक्तीचं नाव असून तो एका कंपनीत काम करायचा. पत्नीसह दोन मुलांसोबत तो राहत होता. २० फेब्रुवारी रोजी त्याची पत्नी मुलांना घेऊन एका लग्नासाठी बाहेरगावी गेली. योग्य संधी असल्याचा विचार करुन गौतम त्याची आधीची प्रेयसी अंजू हिला भेटायला रात्री गुंदासुरा गावात गेला. पण आवाज झाल्यामुळे रात्रीतून तरुणीचा भाऊ उठला आणि त्याने घरातील लाइट लावली. पकडले जाण्याच्या भीतीने गौतमने लाइट सुरू होताच घरातून पळ काढला, त्याला पळताना बघून अंजूच्या भावानेही त्याच्या मागे धाव घेतली. पण रात्री शेतातून पळताना अंधारामुळे तो एका शेतीतील विहिरीत पडला.

दुसऱ्या दिवशी गौतमची पत्नी घरी परतल्यावर पती घरात नसल्याचं बघून तिने पोलिंसांशी संपर्क साधला. त्यानंतर गौतमचा शोध घेताना पोलिसांना त्याची बाइक गुंदासुरा गावाबाहेर पडलेली दिसली. तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी अंजूकडे चौकशी केली, त्यावेळी तिने गौतम भेटायला आला होता पण भाऊ उठल्यावर घाबरुन तो पळाला अशी कबुली दिली. गौतम ज्या दिशेने पळाला होता त्या दिशेने शोध घेतल्यावर पोलिसांना एका शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनानंतर बुधवारी पोलिसांनी मृतदेह त्याच्या पत्नीकडे सुपूर्द केला.