कोण म्हणतं भारताच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना अस्खलित इंग्रजी बोलता येत नाही. ज्यांना असे गैरसमज आहेत त्यांना ‘वंडर गर्ल जान्हवी’ चा व्हिडिओ नक्की दाखवा. हरयाणामधल्या छोट्याश्या गावातून आलेली जान्हवी अस्खलित इंग्रजी बोलते, तिच्या प्रत्येक शब्दांचे उच्चार हे ब्रिटिशांसारखे आहेत. तिच्या इंग्रजीनं अनेकांना अचंबित करून सोडलं आहे. गेल्यावर्षी भारतभ्रमंती करायला आलेल्या परदेशी युवतींशी तिनं इंग्रजीत संवाद साधला. तिची भाषा, उच्चार ऐकून त्याही चाट पडल्या.

जान्हवी फक्त इंग्रजी बोलते असं नाही तर ८ वेगवेगळ्या भाषा ती बोलते. ती फक्त १३ वर्षांची आहे. लहान असल्यापासून तिचे बाबा तिला इंग्रजी शिकवत आहेत. या भाषेची तिला नंतर एवढी आवड जडली की हळहळू टीव्हीवरचे इंग्रजी कार्यक्रम, बातमीपत्र ऐकून तिनं उच्चारही सुधारले. खूप कमी वयात तिने इंग्रजी चांगल्याप्रकारे आत्मसात केली आहे. ती इंग्रजीत इतकं सुंदर बातमीपत्र वाचते की कोणालाही त्यावर विश्वास बसणार नाही. इंग्रजीबरोबरच जपानी, फ्रेंच यासारख्या भाषाही ती शिकली. विशेष म्हणजे फक्त व्हिडिओ आणि टीव्ही पाहून तिने ही भाषा आत्मसात केली आहे.