अमेरिकेमधील मिनिसोटा येथील टार्गेट स्टारबक्समध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एका मुस्लीम तरुणीला ऑर्डर देताना कॉफी कपवर तिचं नाव लिहिण्याऐवजी आयएसआयएस असं लिहिण्यात आलं होतं. मध्य आशियामधील दहशतवादी संघटनेच्या नावाने या मुलीचा उल्लेख केल्याचा आरोप आता कॅफे शॉपवर केला जात आहे. या प्रकरणामध्ये या १९ वर्षीय मुलीने मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली आहे.  यासंदर्भातील वृत्त सीएनएनने दिलं आहे.

आयशा असं या मुलीचं नाव असून घटडलेल्या प्रकरणामध्ये अमेरिकेतील मिनिसोटा येथील अमेरिकन इस्लामिक रिलेशनने तिची बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. कॅफे व्यवस्थापनाने आपल्या धार्मिक भावनांच्या आधारे दुजाभाव केल्याचा आरोप आयशाने केला आहे. सोमवारी मिनिसोटा येथील मानवी हक्क आयोगासमोर पहिल्यांदा हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. “कपवरील आयएसआयएस अक्षरं पाहिल्यावर मला धक्काच बसला,” अशी पहिली प्रतिक्रिया १९ वर्षीय आयशाने सीएनएनशी बोलताना दिली. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया या दहशतवादी संस्थेच्या नावाने या मुलीचा उल्लेख कपवर करण्यात आला होता. कट्टर इस्लामिक विचारसरणीसाठी आणि दहशतवादी कारवायांसाठी कृप्रसिद्ध असणाऱ्या आयएसआयएसशी संबंध जोडल्याने आयशा दुखावली गेली. या दुकानामधील सर्व कपवर ही अक्षर लिहिण्यात आली होती का यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नसली तरी माझ्या कपवर ती अक्षर होती असं आयशा सांगते.

“कॉफी कपवरील तो मजकूर पाहताच मला रडू आलं. मला ते अपमानास्पद वाटलं. मुस्लीमांसोबत या जगात दुजाभाव होत असल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. या वयामध्ये मला हे सर्व सहन करावं लागेल असं वाटलं नव्हतं. घडलेला प्रकार योग्य नाही,” असंही आयशाने म्हटलं आहे.

हा सर्व प्रकार १ जुलै रोजी सेंट पॉल मिडवेमधील टार्गेट स्टारबक्समध्ये घडल्याचे आयशा सांगते. “सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण मास्क घालूनच कॅफेमध्ये गेलो होतो. मात्र माझं नाव त्या महिलेला नीट ऐकू जावं म्हणून मी ते दोन वेळा सांगितलं,” असंही आयशाने नमूद केलं आहे. “मी अनेकदा तिला स्पष्ट उच्चार करुन माझं नाव सांगितलं. ते आयएसआयएस ऐकू जाण्याची शक्यता फारच कमी आहे. आणि आयशा हे काही अगदीच अनोळखी नाव नाहीय,” असंही तिने सीएनएनशी बोलताना म्हटलं आहे.