शेजारी आणि शेजारधर्म हा खरं तर मोठा चर्चेचा विषय आहे. म्हणजे शेजाऱ्यांकडून ज्याप्रमाणे चांगली वागणूक मिळते तशीच कधीतरी अगदी खडूस म्हणता येईल अशाप्रकारची वागणुकही मिळते. तर कधीतरी शेजाऱ्यांचे किंवा इमारतीमध्ये राहणाऱ्या काही जणांचं वागणं हे आपल्या समजण्यापलीकडचं असतं असं वाटतं. असंच काहीसं झालं आहे हर्ष नावाच्या एका व्यक्तीबरोबर. त्यासंदर्भात त्याने ट्विटरवरुन माहिती दिली आहे आणि सध्या हर्षविरोधात तक्रार करणाऱ्या काकू चर्चेचा विषय ठरत आहेत.

हर्षने ट्विटरवरुन एक पत्र शेअर केलं आहे. हे पत्र इमारतीमध्ये हर्षच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने सोसायटीच्या कमिटीमधील प्रमुखांना पाठवलं आहे. या पत्रामध्ये तक्रार करणाऱ्या काकूंनी हर्षच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हर्ष यांनी त्यांच्या घरी आलेल्या कामागारांच्या मदतीने इमारतीच्या लिफ्टने दीड टनचा एअर कंडिशन चौथ्या मजल्यावर आणण्यास सांगितल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

आता या तक्रारीमध्ये चुकीचं काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. म्हणजे लिफ्टने एसी चौथ्या मजल्यावर नेल्याप्रकरणी तक्रार करण्यासारखं काय आहे?, हा प्रश्न पडणं सहाजिक आहे. मात्र आपली तक्रार नक्की काय आहे हे या महिलेने पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. “इमारतीमधील दोन्ही लिफ्टची क्षमता ही ३५० किलोची आहे. मी त्याला अनेकदा नियमांचे उल्लंघन न करताना नियम पाळण्याचा सल्ला दिला. अवजड सामान वाहून नेण्यासाठी लिफ्ट वापरु नये असं मी त्याला सांगितलं. त्यावर त्याने माझ्याशी वाद घालत दीड टनांच्या एसीचे वजन २० किलो असते १५०० किलो नाही असं सांगण्यास सुरुवात केली,” असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

आता पत्रातील हा मजकूर वाचून तुम्हीही डोक्याला हात मारुन घेतला असेल. हर्षचीही अशीच काहीतरी पहिली प्रतिक्रिया होती. त्याने हे पत्र “या माझ्या शेजाराच्या बाईने माझ्याविरोधात सोसायटीकडे तक्रार केली आहे. हे पाहा तिने पाठवलेलं तक्रारीचं पत्र. ते वाचून तुम्हाला समजेल ती किती वेडी आहे,” अशा कॅप्शनसहीत ट्विट केलं आहे.

दीड हजारांहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे तर १० हजारांहून अधिक जणांनी याला लाइक केलं आहे. या ट्विटवर शेकडो कमेंट असून अनेकांनी या तक्रारदार महिलेची खिल्ली उडवली आहे.

१) आमची मुलगी…

२) हे वाचून एसी लावणारे

३) सकारात्मक बाजू

४) भावा तू उद्या टाकी लाव

५) माझी पहिली प्रतिक्रिया

एकंदरितच या प्रकरणाचे गांभीर्य आणि लावलेला तर्क पाहता हर्षवर कारवाई होणार नाहीच पण या महिलेने पाठवलेल्या या पत्रामुळे नेटकऱ्यांची करमणूक झाली हे मात्र नक्की.