सोमवारी रात्रीपासून ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. भारताचा धडाकेबाज माजी खेळाडू युवराज सिंगने माफी मागावी अशी मागणी नेटकरी करत आहेत. रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटदरम्यान युवराज सिंगने आक्षेपार्ह शब्द उच्चारला होता. त्या शब्दामुळे एखाद्या समाजाचा अपमान झाल्याचे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

युवराज सिंग याने लॉकडाउनदरम्यान अनेकदा लाइव्ह चॅटच्या माध्यमातून खेळाडू आणि चाहत्यांशी संवाद साधला. विविध खेळाडूंशी संवाद साधताना त्याने काही प्रश्नांची उत्तरंदेखील दिली. रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्यामध्ये लाइव्ह चॅट सुरू होतं. त्यावेळी रोहित शर्मा म्हणतो की, सर्वजण निवांत आहे. चहल, कुलदीपही ऑनलाइन आले आहेत. युवराजने त्यावेळी बोलता बोलता मस्करीत चहलबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारला. रोहितनेही मस्करीत त्याला दुजोरा देत म्हटले की, मीही चहलला सांगितले की, व्हिडिओला बापाला कशाला नाचवले….दोन खेळाडूतील हा संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नेटकऱ्यांनी युवराजला धारेवर धरताना #युवराज_सिंह_माफी_मांगो अशी मागणी ट्विटर केली आहे.

चहल टिकटॉकवर विविध प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याच्या व्हिडिओमुळे सध्या तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.मध्यंतरी वडिलांसोबतचा त्याचा एक व्हिडिओ चर्चात होता. रोहित शर्मा आणि युवराज याच व्हिडिओबद्दल लाइव्ह चॅटमध्ये बोलत होते.