भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ याला मागच्या वर्षात आपल्या फलंदाजीची चमक दाखवता आली नाही. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये त्याने १३ सामन्यांमध्ये केवळ 228 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याला जास्त धावा बनवता आल्या नाहीत, त्यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
गचाळ कामगिरीमुळे सोशल मीडियातून पृथ्वीवर अनेकांनी टीका केली, त्याला खूप ट्रोल करण्यात आलं. पण आता पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दणदणीत द्विशतक झळकावून आपल्या टीकाकारांसह ट्रोलर्सनाही सणसणीत उत्तर दिलंय.
पुद्दुचेरीविरोधात खेळताना मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ याने शानदार फलंदाजी करताना फक्त 142 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावलं. त्याने नाबाद 221 धावा चोपल्या आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज बनला.
आपल्या विक्रमी खेळीनंतर शॉने आपल्या टीकाकारांना सणसणीत उत्तर दिलं. शॉने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक मीम शेअर केले, यात पृथ्वी शॉ निराश बसलेला दिसतोय. गेल्या आयपीएलवेळी पृथ्वीच्या याच फोटोवरुन अनेक मीम व्हायरल झाले होते. शॉने त्या फोटोसोबतच द्विशतक झळकावतानाचा फोटो जोडून एक मीम शेअर केले, यावर ‘एडिट करके इमेज तेरे भाई ने मीम बना दिया….मेहनत करके तेरे भाई ने ड्रीम बना दिया’ असा मजकूर आहे.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून वैयक्तिक सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रमही आता पृथ्वी शॉच्या नावावर झाला आहे. हा विक्रम आधी संजू सॅमसनच्या नावावर होता. सॅमसनने नाबाद 212 धावंची खेळी केली होती.