Tik Tok ने सर्वांना वेड लावलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि Tik Tok या अॅपचे अनेक चाहतेही आहेत. Tik Tok मुळे अनेकामध्ये लपलेला कलाकार मग तो कसाही असेल तो बाहेर येऊ लागला आहे. आता पुण्यातही Tik Tok फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने Tik Tok या अॅपवर बंदी घातली होती. परंतु काही दिवसांनी ती हटवण्यात आली. Tik Tok वर दररोज लाखो व्हिडीओ अपलोड होत असतात. तसंच हे व्हिडीओ सोशल मीडिया ट्रेंडही बनत असतात. आता असेच व्हिडीओ तयार करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्यात आयोजित होणाऱ्या या फेस्टिव्हलसाठी 20 ऑगस्टपर्यंत व्हिडीओ पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलचे पोस्टर सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tik Tok युझर्ससाठी ही मोठी संधी आहे. त्यांनी या माध्यमातून आतापर्यंत काय केलंय हे जगाला दाखवण्याची संधी मिळणार आहे. Tik Tok युझर हे स्वत: प्रोड्युसर, डायरेक्टर आणि कॅमेरा पर्सनही आहेत, अशी प्रतिक्रिया फिल्म फेस्टिव्हलचे आयोजक प्रकाश यादव यांनी दिली. आजकाल अनेक कॉलेज स्टुडंट्स Tik Tok व्हिडीओ तयार करत असतात. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एन्ट्रीसाठी आम्ही रजिस्ट्रेशन मागवले आहेत. तसेच पुरस्कारांमध्येही अनेक कॅटेगरी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये बेस्ट कॉमेडी, बेस्ट इन प्रँक आणि सोशल अवेअरनेससारख्या कॅटेगरीदेखील आहेत. ज्युरी हे व्हिडीओ पाहणार असून विजेत्यांना 33 हजार 333 रूपयांचे पारितोषिक देण्यात येणआर आहे. या ज्युरीमध्ये काही अॅक्टर्स आणि डायरेक्टर्सचा समावेश करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काही नेटकऱ्यांकडून याचे स्वागत होत आहे. तर काही जणांनी याला ट्रोल केले आहे.