– बिपीन देशपांडे

औरंगाबादजवळ पण काहीसे आडमार्गी असलेल्या गाडीवाट या लहानशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने जापनीज भाषा शिकत असून एक सकारात्मक वृत्त म्हणून त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑक्टोबर रोजीच्या त्यांच्या मन की बातच्या ट्विटर अकाऊन्टमध्ये तसे नमूद केले आहे. दर महिन्याच्या शेवटी पंतप्रधान साधत असलेल्या मन की बातच्या संवादात गाडीवाटचा उल्लेख करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील वृत्त लोकसत्तात सर्व प्रथम १३ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध झाले होते.

औरंगाबादपासून २५ किलोमीटर अंतरावरील गाडीवाट गावातील परदेशी भाषा उपक्रमांतर्गत पाचवी ते आठवीतील विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने जापनीज भाषा शिकत आहेत. दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळात आम्हाला मुलांना जापनीज भाषेचे अभ्यासक सुनील जोगदेव हे गुगल मिटवर ऑनलाईन विनामूल्य धडे देतात. शिक्षक दादासाहेब नवपुते यांनी मुख्याध्यापक पद्माकर हुलजुते यांच्यापुढे जापनीज भाषा मुलांना शिकवण्याचा विचार मांडला. विस्तार अधिकारी रमेश ठाकूर आणि शिक्षणाधिकारी सूरजकुमार जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांचे जापनीज भाषेचे धडे सुरू आहेत. मुलांनाही त्यात गोडी निर्माण झाल्याचे शिक्षक दादासाहेब नवपुते यांनी सांगितले. जापानमध्ये वास्तव्यास असलेले आणि महाराष्ट्रीयन असलेले प्रशांत परदेशी यांच्यापर्यंत मुले जापनीज शिकत असल््याचे वृत्त पोहोचल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व जापानी भाषेचा शब्दकोष व काही पुस्तकेही पाठवून दिली होती.

रोबोटिक्स ज्ञानाबद्दल आम्हाला जिज्ञासा असून त्यातूनच जापनीज भाषा शिकावीसी वाटली, असे सहावीत शिकणारा शुभम कोळगे याने सांगितले. ‘‘मुलांनी जापनीज भाषाच का निवडली’’ याचे उत्तर शोधले तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सच्या ज्ञानाबद्दल आकर्षण असल्याचे दिसून आले. या भाषेसाठी शाळेने २० विषयमित्र म्हणजे स्वत शिकून जे इतर मुलांना ज्ञान देऊ शकतील, अशा विद्यार्थ्यांना धडे देण्यास सुरुवात केली. हे २० विषयमित्र इतर ८० विद्यार्थ्यांना शिकवतात. एकूण १०० विद्यार्थी सध्या जापनीज भाषा शिकत आहेत, असे दादासाहेब नवपुते म्हणाले.

पंतप्रधानांकडून दखल याचा मनस्वी आनंद
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाडीवाटचे विद्यार्थी जापनीज शिकत असल्याच्या वृत्ताची दखल घेतली याच्यासारखा दुसरा आनंद कुठला नाही. संपूर्ण गावकरी आणि विद्यार्थी वर्गही सुखावला आहे. शिक्षणाप्रती जागरूक असलेला गावकरी वर्ग आणखी संवेदनशील झालेला आहे. यामध्ये जापनीज शिकवणारे सुनील जोगदेव सरांसह शिक्षण विभागातील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही मोठे योगदान आहे. आता शाळेचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर यावे, यासाठी गावकरी प्रयत्न आहे.- दादासाहेब नवपुते, शिक्षक.

असा चालतो संवाद

सुदीक्षा, ‘‘कानोज्यो नो ओ नामाए वा नान देस का (तिचे नाव काय आहे).

अमृता, ‘‘कानोज्यो वा वैष्णवी सान देस. वाताशीनो तोमोदाची देस (ती वैष्णवी आहे. ती माझी मैत्रीण आहे.). सुदीक्षा, ‘‘ओ सो देस का, वैष्णवी सान हाजीमेमाशते, वाताशिवा सुदीक्षा देस. अमृता सान नो तामोदाची देस. (असे आहे तर, वैष्णवी नमस्कार, मी सुदीक्षा. अमृता माझी मैत्रीण आहे.’’

वैष्णवी, ‘‘हाजीमेमाशते सुदीक्षा सान. दो झो योरोशुकू (नमस्कार सुदीक्षा. तुला भेटून आनंद झाला.) सुदीक्षा, ‘‘दो इताशी माशते- (अगदी खरंय. मलाही आनंद झाला.), असा जापनीज संवाद विद्यार्थ्यांमध्ये ऐकायला मिळतो.