वाघ असां उच्चार जरी केला तरी आपल्या अंगावर काटा येतो. या प्राण्याला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घाबरतात. अंगावर चट्टेपट्टे असणारा हा प्राणी मोठ्या शानमध्ये जगत असतो. एरव्ही आपल्या भक्ष्यांवर हल्ला करणारा हा वाघ माणसांवरही तशाच पद्धतीने हल्ला करतो. यासारख्या घटना विविध देशांमध्ये घडल्याचे आपण माध्यमांतून वाचत असतो. हाच वाघ कधी जंगलातून वस्तीमध्ये येत नागरिकांचा बळी घेतो तर कधी हा प्राणी प्राणिसंग्रहालयात त्याला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर किंवा कर्मचाऱ्यांवर थेट हल्ला करतो.

रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये नुकतीच अशाप्रकारची एक धक्कादायक घटना घडली. कलिनिग्राड प्राणिसंग्रहालयातील टायफून नावाच्या वाघाने महिलेवर हल्ला केला. वाघाला अन्न देण्यासाठी आलेल्या एका महिला कर्मचाऱ्यावर हा हल्ला झाला. आता वाघाने या महिलेला आपल्या ताब्यात घेतले म्हटल्यावर त्या महिलेची काय अवस्था झाली असेल ते वेगळे सांगायला नको. घाबरलेली ही महिला सुरुवातीला शांत राहिली मात्र नंतर तिने आपली सुटका करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण या वाघाने तिला फरफटत आपल्या गुहेपर्यंत नेले.

यावेळी संग्रहालयात इतर कर्मचारी आणि पर्यटकही उपस्थित होते. वाघाच्या तावडीत सापडलेल्या या महिलेचा जीव वाचावा यासाठी या सर्वांनी बरेच प्रय़त्न केले. वाघाने तिला आपल्या तावडीतून सोडावे यासाठी अनेकांनी त्याच्या दिशेने दगड, खुर्च्या आणि दिसेल त्या वस्तू फेकल्या. या वस्तूंना घाबरुन तरी हा वाघ माघार घेईल असे त्यांना वाटले. मात्र तरीही हा वाघ मागे हटण्यास तयार नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेचा जीव वाचवण्यात या सर्वांना यश आलं खरं. पण त्या महिलेची प्रकृती अतिशय गंभीर असून तिच्या शरीरावर मोठ्याप्रमाणात जखमा झाल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु असून तिला बरे व्हायला बराच वेळ लागेल असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.