प्रेम हे आंधळं असतं, त्याला कोणतंही बंधन नसतं. व्यक्ती, पैसा, दिसणं याचे मापदंड लावून प्रेम करता येत नसतं, जपानच्या राजकन्येनं ते पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. आपल्या प्रेमासाठी तिनं राजपद त्यागलं आहे. जपानची राजकन्या आयाको नुकतीच विवाहबंधनात अडकली. जपानच्या राजघराण्यातील नियमाप्रमाणे जर राजकन्येनं एखाद्या सामान्य व्यक्तीशी विवाह केला तर ती लग्नानंतर राजघराण्याची सदस्य राहत नाही. असं असताना केवळ प्रेमासाठी तिनं आपल्या ऐशोआराम आणि राजमहालाचा त्याग केला आहे.

आयको ही जपानचा सम्राट अकिहितोच्या चुलतभावची म्हणजेच दिवंगत राजे ताकामाडो यांची कन्या होय. तिनं ३२ वर्षांच्या केई मोरीयाची लग्नगाठ बांधली. केई हा एका शिपिंग कंपनीचा कर्माचारी आहे. सोमवारी(२९ ऑक्टोबर) पारंपरिक जपानी पद्धतीनं या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी राजकन्येनं जपानचा पारंपरिक पेहराव किमोनो परिधान केला होता.

गेल्या तीन पिढ्यांपासून जपानमधल्या राजघराण्यातील सदस्यांना सामान्य व्यक्तींसोबत विवाह करण्याची परवानी देण्यात आली आहे. यानुसार राजपदावरील कोणतीही व्यक्ती राजघराण्याव्यतिरिक्त सामान्य जनतेशी विवाह करू शकतो. मात्र जर राजघराण्यातील स्त्रियांना विवाह करायचा असेल तर मात्र त्यांना राजपद आणि ऐशोआरामाचा त्याग करावा लागतो. राघराण्यातील नियमाप्रमाणे ती स्त्री शाही कुटुंबाचा भाग राहत नाही. म्हणूनच तिनंही हे राजपद त्यागलं आहे.