हल्ली प्रसिद्ध होण्यासाठी कोणीही काहीही करतं, पण प्रसिद्धीचा हव्यास कधी आपल्या जीवावर बेतू शकतो हे मात्र अनेकांना कळत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. असाच काहीसा प्रकार १९ वर्षांच्या यूट्युबरच्या बाबतीत घडला. यूट्युब चॅनेलला हवी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती तेव्हा आपल्या चॅनेलची प्रसिद्धी वाढवण्यासाठी या दोघांनी जीवावर बेतणारा स्टंट केला आणि यात एकाला आपला जीव गमवावा लागला.

मोनालिसा आणि पेड्रो या जोडप्याने मार्च महिन्यात युट्युब चॅनेल सुरु केले होते. पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. हे दोघंही १९ वर्षांच्या आसपास आहे. तेव्हा झटपट प्रसिद्ध होण्यासाठी त्यांना एक कल्पना सुचली. या दोघांनी जीवावर बेतणारा स्टंट करण्याचं ठरवलं. यामुळे आपले सबस्क्राईबर किंवा व्ह्यू वाढतील असं त्यांना वाटलं आणि दोघंही स्टंट करण्यासाठी तयार झाले. एक जाड पुस्तकं पेड्रोने आपल्या छातीजवळ धरलं आणि मोनालिसाला स्वत:वर गोळी झाडायला सांगितली. पुस्तकाच्या जाडीमुळे बंदुकीची गोळी रोखली जाईल असं दोघांना वाटलं. मोनालिसाने कॅमेरा रेकॉर्डिंग सुरू करून एक फुटांच्या अंतरावरून पेड्रोवर गोळी झाडली आणि काही सेंकदात या दोघांच्या प्रसिद्ध होण्याच्या कल्पनेवर पाणी फेरलं गेलं. पेड्रोचा तिथेच गोळी लागून मृत्यू झाला.

वाचा : आजींचं भन्नाट डोकं! ‘गुडलक’साठी चक्क विमानाच्या इंजिनमध्ये टाकली नाणी

हा स्टंट करण्यापूर्वी ट्विट करत मोनालिसाने आपण जीवावर बेतणारा स्टंट करत असून ही पूर्ण कल्पना पेड्रोची आहे असं सांगितलं होतं. पेड्रोच्या मृत्यूनंतर आता मोनालिसाला पोलिसांनी अटक केली आहे. ती गर्भवती आहे आणि या जोडप्याला एक मुलंही आहे. पोलिसांनी मोनालिसावर हत्येचा गुन्हा दाखल केलाय आणि या प्रकरणात न्यायालयात यावर सुनावणी देखील सुरू आहे.

वाचा : साडी नेसली म्हणून सोहा अली खानवर सोशल मीडियावर टीका