जगभरातील विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकामध्ये नेहमीच सर्वाधिक दात असणे, चेंडूचा सगळ्यात उंच झेल, पाण्याखाली जादू दाखवणे, जास्तीत जास्त नारळ फोडणे आदी विक्रम यात नोंदवण्यात येतात. तर आता या पुस्तकात एका भारतीय महिलेने स्थान पटकावले असून जगात ‘सर्वात जास्त लांब केस’ असा बहुमान तिच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या ४६ वर्षीय महिलेचं नाव स्मिता श्रीवास्तव आहे. ‘सर्वात जास्त लांब केस’ ठेवल्यामुळे तिचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे. स्मिताने तिचे केस वाढवण्यास वयाच्या १४ वर्षांपासून सुरुवात केली. तेव्हापासून ते आतापर्यंत सात ते नऊ फूट इतकी तिच्या केसाची लांबी आहे. स्मिता या महिलेनं तिचे केस बऱ्याच काळापासून कापले नाहीयेत.स्मिता श्रीवास्तव ही महिला भारतीय सांस्कृतिक मान्यतांपासून प्रेरणा घेते, ज्यात लांब केसांचा संबंध देवीशी आहे आणि ते सौंदर्याचे प्रतीक मानतात; म्हणून तिला तिचे लांबलचक केस ठेवायला आवडतात असे तिचे म्हणणे आहे. तिच्या केसांची काळजी घेण्याचा दिनक्रम तिच्या केसांच्या लांबीइतकाच अनोखा आहे. स्मिता आठवड्यातून दोनदा तिचे केस धुते, कोरडे करते, केसांचा गुंता सोडवून नंतर तिला केसांची हेअर स्टाईल करण्यासाठी तीन तासांचा वेळ लागतो. तिला केस धुण्यास ४५ मिनिटे लागतात. त्यानंतर बेडवर केस पसरवून टॉवेलने ती काळजीपूर्वक कोरडे करून घेते.
हेही वाचा…तुम्हीही सिगारेट ओढताय? मग Video तील किळसवाणं दृश्य एकदा पाहाच, पुन्हा ओढताना १०० वेळा विचार कराल
व्हिडीओ नक्की बघा :
२० वर्षात तिने एकदाही तिचे केस कापले नाहीत. स्मिता श्रीवास्तव जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जाते, तेव्हा तिचे लांब केस पाहून सर्व जण आश्चर्यचकित होतात. तिच्या केसांच्या लांबीमुळे लोक कुतूहलाने तिच्याजवळ येतात आणि तिच्या केसांची काळजी घेण्याच्या टिप्स आणि केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी ती वापरत असलेल्या उत्पादनांबद्दल जाणून घेतात.
स्मिता श्रीवास्तव या महिलेस गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे विजेतेपद मिळताच तिचे एक स्वप्न पूर्ण झालं. तसेच ती म्हणाली की, ‘मी माझ्या केसांची जोपर्यंत जमेल तितकी काळजी घेईन. मी माझे केस कधीही कापणार नाही, कारण माझे आयुष्य माझ्या केसांमध्ये आहे.” स्मिता अभिमानाने सांगते, ती कितीही काळ तिचे केस वाढवू शकते. सोशल मीडियावर ही पोस्ट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या अधिकृत @GWR एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.