सेनानिवृत सहकारी किंवा अधिकारी यांच्या कामातील सहकार्य आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात येते. या निरोप समारंभात शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. तर आज सोशल मीडियावर एका प्राण्याचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. आयएफएस अधिकारी धीरज पांडे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यात मादी हत्तीचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कॉर्बेट टायगर रिजर्व्हमध्ये (Corbett Tiger Reserve) ४७ वर्षे आपलं योगदान देणाऱ्या एका ६६ वर्षांच्या मादी हत्तीचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. आयएफएस (IFS) अधिकारी धीरज पांडे यांनी मादी हत्तीचा प्रवास त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिला आहे. या मादी हत्तीचे नाव ‘गोमती’ असे आहे. जंगलातील पेट्रोलिंग, धाडसी बचावकार्य व शौर्य या बाबी म्हणजे गोमतीच्या विलक्षण सेवेचा दाखला आहे. गोमती तिच्या सेवेतून निवृत्त झाल्यामुळे, ती आता सिटीआर (CTR)मध्ये कॅम्प हत्तींच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन आणि त्यांचे पालनपोषण करणार आहे, असे म्हणत गोमतीच्या एकंदरीत प्रवासाबद्दल आयएफएस अधिकारी पांडे यांनी कौतुक करीत तिचे आभार मानले आहेत. मादी हत्तीचा निरोप समारंभ एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
गोमतीचा निरोप समारंभ :
आयएफएस अधिकारी धीरज पांडे यांनी गोमतीच्या निरोप समारंभाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यात सुरुवातीला मादी हत्तीला फुलांचा हार घालण्यात आला आहे. एका कार्यक्रमात आयएफएस अधिकारी त्यांचे मनोगत व्यक्त करतानासुद्धा दिसत आहेत. त्यानंतर मादी हत्ती गोमतीबरोबर अनेक जण फोटो काढताना; तर काही जण निरोप समारंभाचे क्षण त्यांच्या मोबाईलमध्ये टिपून घेताना दिसून आले आहेत. मादी हत्तीवर खडूने नक्षीकाम, सिटीआर (CTR) लिहिलेलं आणि एक चक्र काढलेलं तुम्हाला दिसेल. एकदंरीतच गोमतीचा निरोप समारंभ अगदी खास पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे.
आयएफएस (IFS) अधिकारी धीरज पांडे यांनी त्यांच्या अधिकृत @DrDheerajPandey या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा भावूक क्षण शेअर केला आहे. तसेच गोमतीच्या प्रवासाचं वर्णन त्यांनी कॅप्शनमध्ये केलं आणि तिचं कौतुक केलं आहे. तसेच कशा प्रकारे गोमतीचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला याची झलक त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून दाखवली आहे.