सध्याच्या काळात अनेक लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काहीही करायला तयार असतात. शिवाय इतरांपेक्षा खास आणि अनोखा व्हिडीओ शूट करण्याच्या नादात काही काही लोक धोकादायक स्टंट करायलाही मागुपेढे पाहात नाहीत. मात्र, असे स्टंट करणं अनेकदा जिवावर बेतू शकतं, शिवाय अशा धक्कादायक आणि भयानक स्टंटचे व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या अंगावरही काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसू शकतो. कारण, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने स्वतःला चक्क विमानावर बांधून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय हे विमान उंच आकाशात गेल्यावर तो विमानावर उभा राहिल्याचंही दिसत आहे.
या अनोख्या स्टंटचा व्हिडीओ ड्रू डर्कसेन नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत एक व्यक्ती स्वत:ला विमानावर बांधून घेताना दिसत आहे. शिवाय यावेळी विमानावरुन पडणार नाही यासाठी तो खूप काळजी घेत असल्याचंही दिसत आहे. हा व्यक्ती स्वत:ला बांधून घेत असतानाच पायलट विमान उडवतो. यानंतर विमान आकाशात उंच गेल्याचं दिसत आहे. विमान उंच आकाशात गेल्यानंतर तो व्यक्ती हवेच्या दाबामुळे पडतो की काय? असं व्हिडीओ पाहणाऱ्यांना वाटत आहे. मात्र तो व्यक्ती उंच आकाशात या अनोख्या विमान प्रवासाचा आनंद घेत असल्याचंही दिसत आहे.
हेही पाहा- कशासाठी पोटासाठी! अपंग आई मुलाला पाठीवर घेऊन मागतेय भीक, व्हायरल VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “खरोखर काठावर जगत आहे.” हा व्हिडीओ आतापर्यंत २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने लिहिलं, “मलाही असा स्टंट करायचा आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “भावा तु माझे स्वप्न प्रत्यक्षात जगत आहेस, तुला खूप मज्जा येत असेल.”