Ahmedabad Plane Crash Live CCTV Video : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताच्या दुर्घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. एअर इंडियाचं बोइंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान उड्डाण घेताच काही मिनिटांनी कोसळलं. या विमान अपघातात २७४ जणांनी आपला जीव गमावला आहे. हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाला धडकले, ज्यामुळे विमानाने पेट घेतला. या अपघातात विमानासह आजूबाजूचा परिसरही भस्मसात झाला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर या विमान अपघातादरम्यानचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात असा दावा केला जात आहे की, अहमदाबाद विमान अपघाताच्या ठिकाणावरील हा लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ आहे, ज्यात स्फोटानंतर कानठळ्या बसवणारा आवाज आणि इमारतीला तडे जाऊन सगळीकडे धूळ उडताना दिसतेय. पण, खरंच हा व्हिडीओ अहमदाबाद विमान अपघाताचा लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज आहे का, याबाबतचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर रॉबिन वर्गीस यांनी हा व्हिडीओ त्यांच्या प्रोफाइलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला आहे.
इतर युजर्सही असाच दावा करून तोच व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास :
आम्ही हा व्हिडीओ इनव्हिड टूलवर अपलोड करून आणि त्यातून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
आम्हाला हा व्हिडीओ @qudsn च्या एक्स हँडलवर पोस्ट केलेला आढळला.
कॅप्शनमध्ये असे म्हटले होते (भाषांतर) : लेबनॉनवरील हल्ल्यादरम्यान तूल शहरातील शेख राघेब हर्ब रुग्णालयावर कब्जा करताना केलेल्या बॉम्ब हल्ल्याचे फुटेज.
आम्ही कीवर्ड शोधले तेव्हा वरील पोस्टमध्ये नमूद केलेल्या रुग्णालयाच्या फेसबुक पेजवरदेखील हा व्हिडीओ अपलोड केलेला आढळला.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले होते : ‘अराद अल-कियान-अल-मजरिम’ यांनी लोकांना बरे होण्याची आशा नष्ट करण्यासाठी हा हल्ला केला, कारण शेख राघेब हर्ब यांच्या रुग्णालयातील ‘देवदूत ऑफ मर्सी’ यांचा पौराणिक ‘अल-समुद’ (स्थिरता) होता, देव त्यांना आशीर्वाद देवो आणि शांती देवो.
निष्कर्ष :
लेबनॉनमधील जुना व्हिडीओ अलीकडील अहमदाबादमधील एअर इंडिया अपघाताशी जोडून व्हायरल केला जात आहे, त्यामुळे या व्हिडीओचा अपघाताशी काहीही संबंध नाही. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.