कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना रेझ्युमे हा सर्वांत महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. यामध्ये उमेदवाराची संपूर्ण माहिती दिलेली असते. त्यामुळेच नियोक्त्याला उमेदवाराला भेटण्याआधीच त्याची बहुतांश माहिती समजलेले असते. मात्र उमेदवार आपल्याबद्दलची माहिती कशाप्रकारे सादर करतो याकडेही अनेक नियोक्ते विशेष लक्ष देतात. म्हणूनच सर्वच उमेदवार आपल्या अर्जाच्या माध्यमातून नियोक्त्यावर छाप पाडण्याच्या प्रयत्नांत असतात.

नोकरीच्या अर्जामध्ये आपली पात्रता सादर करत असताना आपण इतर उमेदवारांपेक्षा कसे वेगळे आहोत हेही उमेदवाराला दाखून द्यायचे असते. यामुळेच मुलाखतीच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचणे त्यांच्यासाठी सोपे होते. म्हणूनच आपल्या नोकरीचा अर्ज तयार करत असतात, ते यावर विशेष मेहनत घेतात. सध्या एका पठ्ठ्याने तयार केलेला अर्ज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्यक्तीने आपला अर्ज इतक्या कल्पकतेने तयार केला आहे की आता तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आदित्य शर्मा नावाच्या लिंक्डइन वापरकर्त्याने स्वतःचा अर्ज ज्याप्रकारे हायलाइट केला आहे, त्यामुळे तो अनेकांच्या कौतुकास पात्र ठरला आहे. आदित्य शर्मा हा हाय कंसल्टर या कंपनीचा संस्थापक आणि सीईओ आहे.

प्रवाशांशी अस्खलित संस्कृतमध्ये संवाद साधतो दिल्लीचा ‘हा’ टॅक्सीचालक; Viral Video ने जिंकली सगळ्यांची मनं

आदित्यने आपल्या रेझ्युमची पोस्ट आपल्या लिंक्डइन प्रोफाइलवर शेअर केली आहे. यामध्ये आपल्याला गुगलचे सर्च पेज दिसेल यामध्ये. ‘चांगला कर्मचारी कसा असतो?’ हा प्रश्न शोधण्यात आला आहे. गुगल क्रोमच्या डार्क मोडमध्ये हे डिझाईन बनवण्यात आले आहे. यानंतर खाली तुम्हाला ‘आदित्य शर्मा’ असे म्हणायचे आहे का? असे लिहलेली एक ओळ दिसेल. त्या खाली आदित्यची शैक्षणिक आणि कामाची संपूर्ण पार्श्वभूमी देण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या लिंकही देण्यात आल्या आहेत. हा फोटो शेअर करत आदित्यने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, “गुगल ही अनेकांसाठी एक ड्रीम कंपनी आहे. मात्र ते खूपच निवडक आहेत. म्हणूनच मी एका गुगल डार्क थीम अर्जाचा कल्पक व्हर्जन घेऊन आलो आहे. तुम्हाला वाटते का की हा अर्ज नियोक्त्याला आकर्षित करेल? मी ही डिझाइन तयार करण्यासाठी फिग्माचा वापर केला आहे. कृपया प्रतिक्रिया द्या.”

creative resume google
Photo : LinkedIn

आदित्यने १३ नोव्हेंबरका शेअर केलेली पोस्ट खूपच व्हायरल झाली आहे. आतापर्यंत या पोस्टला १२ हजारांहूनही अधिक लोकांनी लाइक केले असून जवळपास दोन हजार लोकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. एक युजर म्हणाला, ‘आदित्य शर्मा, तुमच्या टेम्प्लेटचा वापर करण्यासाठी माझ्याकडे खूप लोक रांगेत उभे आहेत. कृपया लवकर शेअर करा.’ तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, ‘तुमची कल्पना आणि रेझ्युमेची ही आवृत्ती कौतुकास्पद आहे, परंतु रेझ्युमे आणि कव्हर लेटर्स बहुतेकदा प्रिंट करून फाइल्समध्ये ठेवले जातात. त्यामुळे गडद थीम प्रिंट पेपर फ्रेंडली नसल्यामुळे तुमची माहिती दिसणार नाही!’