सध्या विभक्त कुटुंब पद्धती अनेक ठिकाणी दिसून येते. नवरा-बायको दोघंही कामाला जात असल्याने घराकडे, मुलांकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. यात मुंबईसारख्या शहरात परिस्थिती अशी आहे की, आई-वडील कामावर जात असल्याने अनेक शाळकरी मुलं स्वत:ची तयारी करून एकटे शाळेत जातात. दिवसभर त्यांची काळजी घेणारं घरात कोणी नसते. पण, अशाप्रकारे मुलांना एकटं शाळेत किंवा क्लासला सोडणं पालकांना महागात पडू शकतं. कारण मुंबईतून एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यात एक अज्ञात व्यक्ती एका शाळकरी मुलाला फसवून त्याला मुंबई लोकलने पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता, असा दावा केला आहे. पण काही महिलांच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचा प्लॅन फसला. यानंतर पुढे काय घडलं पाहू….
इन्स्टाग्रामवर @amchi_mumbai नावाच्या एका पेजवरून मुंबई लोकलने शाळकरी मुलाला किडनॅप करून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ पकडल्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये संपूर्ण घटना सांगण्यात आली आहे. तसेच पालकांना, मुलांना शाळा, क्लासेसला एकट्याने सोडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
कॅप्शनमधील माहितीनुसार, कर्जतवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमध्ये ४ मार्च २०२४ रोजी एक अनोखळी व्यक्तीने शाळेतून सुटलेल्या एका लहान मुलाला “तुझा आई-वडिलांनी मला आणायला पाठवलं आहे”, असे सांगून थेट सीएसएमटी स्टेशनवर घेऊन जात होता. त्या लहान मुलाला तो लेडीज डब्यातून घेऊन जात होता.
यावेळी विक्रोळी स्थानकात उतरणाऱ्या काही महिलांनी त्या लहान मुलाची सहजपणे विचारपूस केली. यावेळी बोलता- बोलता काही वेळाने महिलांना त्या अनोखळी व्यक्तीवर संशय आला. ज्यानंतर त्या लहान मुलाने त्याबरोबर नेमकं काय घडलं ही सत्य घटना महिलांना सांगितली. यावेळी विक्रोळी रेल्वे पोलिसांनी काळजीपूर्वकपणे लक्ष देऊन त्या अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेतले.
सदर घटनेतील अनोळखी व्यक्ती त्या शाळकरी मुलाला फसवून पळवून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र मुंबई लोकलमधील काही महिलांच्या प्रसंगावधानाने त्या व्यक्तीचा प्लॅन फसला, यानंतर महिलांनी त्याला विक्रोळी स्थानकात पोलिसांच्या ताब्यात दिले.
पण, या घटनेनंतर तरी पालकांनी मुलांना शाळेतून, क्लासेस किंवा कुठेही बाहेर एकटं पाठवताना काळजी घेतली पाहिजे, तसेच सावधान राहिले पाहिजे, असे आवाहन यातून केले जात आहे. परंतु, या घटनेबाबत सोशल मीडियावरील अनेक युजर्स विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत. तो अनोळखी व्यक्ती त्या शाळकरी मुलाच्या ओळखीचा होता का किंवा त्याने त्या मुलाला कशाप्रकारे फसवणूक आणलं अशाप्रकारचे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.