जगभरातील अनेक देशांमध्ये रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी वेगवेगळे तंत्र वापरले जाते. भारतातही अनेक शहरांमध्ये रस्ते अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. तरीही हे रस्ते अपघात थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच हंगेरीतील एका रस्त्यावर गाड्यांच्या वेग मर्यादेसाठी एक अनोखा प्रयोग राबवण्यात येत आहे, जो आता अनेकांच्या पसंतीस पडत आहे. या रस्त्यावरून ठराविक वेगात गाडी चालवल्यास चक्क गाणं वाजू लागते. जे ऐकताना योग्य वेग मर्यादेत वाहन चालविणाऱ्यांचा गाणं वाजून एकप्रकारे सन्मान केला जातो असं वाटते. हा अनोखा प्रयोग भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनादेखील फार आवडला आहे. आनंद महिंद्रा यांनी या अनोख्या प्रयोगाचा एक व्हिडीओ शेअर करत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एक मागणी वजा खात्री व्यक्त केली आहे. या व्हिडीओमधील गाड्यांच्या वेग मर्यादेसाठी केलेला प्रयोग नेमका काय आहे आणि त्यावर आनंद महिंद्रा नेमकं काय म्हणाले जाणून घेऊ…

व्हिडीओत नेमके काय दिसते?

हा व्हिडीओ एका कारच्या आतून रेकॉर्ड करण्यात आला आहे, ज्यात रस्त्यावरून योग्य वेग मर्यादेत गाडी जात असताना अचानक एक गाणं वाजू लागते. यावेळी आपल्या स्वागतासाठी हे गाणं वाजत असल्याचा अनुभव येतो. हा प्रयोग आता अनेकांची मनं जिंकत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा हंगेरीचा म्युझिकल रोड आहे, ज्यावर तुम्ही योग्य वेग मर्यादेत गाडी चालवल्यास तुमच्यासाठी गाणं वाजू लागते.

आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरींकडे ‘ही’ मागणी

भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर हायवेवरील या अनोख्या प्रयोगाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रांनी लिहिले की, किती छान कल्पना आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या देशातील महामार्गांवरही अशी यंत्रणा बसवतील याची मला खात्री आहे, पण अडचण एवढीच आहे की कोणतं गाणं किंवा म्युझिक वाजवायचे. कदाचित गाणं प्रत्येक राज्यानुसार बदलावे लागेल.

‘भारतात असं झालं तर टोलनाक्यावर काय वाजेल?’ युजर्सच्या प्रतिक्रिया

हा जुना व्हिडीओ असला तरी तो पुन्हा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर भरपूर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, भारतात असं झालं तर टोलनाक्यावर कोणतं गाणं वाजेल आणि लोक त्यावर कसे रिॲक्ट करतील याचा विचार करा; तर दुसऱ्या युजरने टोमणा मारत लिहिले की, कृपया भारतात असे सुरू करू नका, फक्त सुरक्षित रस्ते बनवा, तेच पुरेसे आहे. तर अनेकांनी या प्रयोगाचे कौतुक करत लिहिले की, रस्ते प्रवासादरम्यान लोकांच्या सुरक्षेसाठी हा योग्य मार्ग आहे.