Ashadhi Wari 2025 Beautiful Viral Video : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीला जाण्याची महाराष्ट्रात एक परंपरा आहे. दरवर्षी मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. तहान-भूक, जात-धर्म विसरून, अनवाणी चालत, फुगड्या, भजन गात ते पंढरपूरची वाट धरतात. त्यानिमित्तानं देहू, आळंदीहून संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्याही पंढरीमध्ये पांडुरंगाच्या भेटीस दाखल होतात. वारीचा हा संपूर्ण सोहळा नयनरम्य असल्यामुळे अनेकांना एकदा तरी वारीचं सुख, चैतन्य अनुभवण्याची इच्छा असते. तर, अनेक जण वर्षानुवर्षं वारी अनुभवताना दिसतात. सध्या अशाच एका पांडुरंगाप्रति भक्ती असणाऱ्या अपंग वारकऱ्याचा एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक हीच खरी पांडुरंगावरील भक्ती असल्याचं म्हणतायत. शरीर थकलं; पण मनात पांडुरंगाप्रति अपार श्रद्धेपोटी हे अपंग आजोबा तब्बल ३० वर्षांपासून वारी करतात. त्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

वारी म्हणजे आनंद, चैतन्य व एक वेगळा उत्साह असतो. पांडुरंगाप्रति असलेली सेवा, भक्ती व्यक्त करण्याचा तो सोहळा असतो. त्यामुळे दरवर्षी हजारो भाविक वारीचा अनुभव घेण्यासाठी पंढरपुरची वाट धरतात. या व्हिडीओतही एका अपंग व्यक्ती चालता येत नसतानाही फक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरची वारी करतेय. हा व्हिडीओ पुणे शहरातील असल्याचे सांगितले जात आहे.

भरपावसात कपडे चिखलानं माखलेले असतानाही ही दोन्ही पायांनी अपंग असलेली व्यक्ती केवळ हातांच्या आधारे रस्त्यावरून मार्गक्रमण करतेय. पायांअभावी मांडीवरच कपड्यांची एक बॅग ठेवून, ते हळूहळू पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. त्यांच्या आजूबाजूने भक्तिरसात न्हालेले हजारो वारकरी विठ्ठलनामाच्या गजरात टाळ-मृदंग वाजवीत, पुढे पुढे चालत आहेत. अशाप्रकारे हे अपंग आजोबा गेल्या ३० वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर वारी करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारीतील सुंदरता दर्शवणारा हा व्हिडीओ @_chaitanya_edits नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोक अनेक कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, असा भक्त होणे नाही, राम कृष्ण हरी! दुसऱ्या युजरने लिहिले की, काय बोलू मी? शब्दच नाहीत माझ्याकडे. हीच असते खरी भक्ती, राम कृष्ण हरी! तिसऱ्या युजरने लिहिले की, माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या अशा लोकांसाठी व्यवस्था केली पाहिजे.