नुकताच महिला प्रीमियर लीग (WPL)चा अंतिम सामना पार पडला. त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्सवर आठ विकेट्सनी विजय मिळवीत इतिहास रचला आहे. आरसीबीच्या या विजयानंतर बेंगळुरूमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. हा विजय आरसीबीच्या चाहत्यांसाठी खूप खास होता. कारण- आजपर्यंत आरसीबीला आयपीएलमध्ये विजेतेपद मिळविता आलेले नाही. पण, या विजयानंतर बंगळुरूमधील एक क्रिकेटप्रेमी कॅब ड्रायव्हर इतका आनंदी झाला की, त्याने आपल्या कॅबमध्ये बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला एक छोटीशी खास भेट दिली; जी पाहून प्रवासीही खूश झाले. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॅब ड्रायव्हरकडून प्रत्येक प्रवाशाला ‘ही’ भेट

आरसीबी महिला क्रिकेट संघाच्या विजयानंतर बेंगळुरूमधील एका कॅब ड्रायव्हरने केलेल्या सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवनीत कृष्णा (@navkrish55) नावाच्या युजरने या कॅब ड्रायव्हरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्याने सांगितले की, आनंदी कॅब ड्रायव्हर; जो बेंगळुरूमध्ये त्याच्या कॅबमध्ये बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला चॉकलेट भेट देत, आरसीबीचा विजय साजरा करीत आहे. यावेळी युजरने कॅब ड्रायव्हरने त्याला दिलेल्या चॉकलेटचा फोटो काढून, सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वापरकर्त्याने पोस्टमध्ये काय लिहिले?

नवनीतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “आज सकाळी मी नम्मा बेंगळुरूमध्ये एका कॅबमध्ये बसलो आणि ड्रायव्हरने मला हे चॉकलेट दिले. आरसीबी जिंकल्यामुळे तो त्याच्या सर्व प्रवाशांना हे चॉकलेट देत आहे. त्याबद्दल हे शहर आणि आरसीबीचे चाहते त्याचे आभारी आहेत.”