Peacock Video Viral : मोर हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे. त्याचा चमकणारा निळा रंग, इंद्रधनुषी पंख आणि लांब फुलणारा पिसारा, ज्यामुळे तो आणखीच सुंदर दिसतो. त्याचं मोहून टाकणारं सौंदर्य अनेकांना फार आवडतं. तुम्ही लहानपणी ‘नाचरे मोरा’ हे गाणं ऐकलं असेल, पण मोराला खरंच कधी पिसारा फुलवून थुई थुई नाचताना पाहिलं आहे का? नसेल तर सध्या एका सुंदर मोराचा पिसारा फुलवून नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमचंही मन हर्षित होईल.
हलक्या पावसाच्या सरी कोसळताच जंगलात मोर दिसू लागतात. पावसाचा पहिला थेंब अंगावर पडताच ते त्यांचे रंगीबेरंगी पंख पसरत नाचू लागतात. पण, शहराच्या धावपळीच्या जीवनात लोकांना हे सुंदर दृश्य प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. अशा परिस्थितीत एका ट्रॅव्हल ब्लॉगरने अशाच एका मोराचं मन मोहून टाकणारा सुंदर अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, ज्याचा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक महिला रस्त्याच्या कडेला आराम करत असलेल्या मोराला एकटक पाहत होती. याचवेळी अजून एक मोर तिथे येतो. त्याला पाहून झोपलेला मोर लगेच उभा राहतो आणि पंख पसरून नाचू लागतो. या प्रेमळ नृत्यातून तो लांडोरींना स्वतःकडे आकर्षित करत होता.
त्याच्या पिसाऱ्याचा रंग हा देवाने त्याच्यावर पाचू माणकांची खैरात केल्यासारखा दिसत होता, तर डोक्यावर तुरा राजमुकुटाप्रमाणे वाटत होता, त्यामुळे तो मोर पक्षी जातीतील राजासारखा दिसत होता.
दरम्यान, विणीच्या हंगामात मोर लांडोरींना आकर्षित करण्यासाठी मनमोहून टाकणारे प्रेमनृत्य करताना दिसतात. हे मोर लांडोरीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी असे करतात. जेव्हा तो आपला पिसारा फुलवत थुई थुई नाचू लागतो, तेव्हा असे दिसते की, जणू तो निसर्गाचा एक अनोखा चमत्कार आहे.
मोराचा हा सुंदर व्हिडीओ @khan.isa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या या रीलला आतापर्यंत ३७ दशलक्षाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये या सुंदर दृश्याचे मनापासून कौतुक केले आहे.
एका युजरने लिहिले की, ‘कॅमेरादेखील या रंगांचे सौंदर्य पूर्णपणे दाखवू शकत नाही.’ दुसऱ्याने लिहिले की, “किती सुंदर क्षण आहे.” तिसऱ्याने लिहिले की, “आज मी पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट.” शेवटी एकाने लिहिले की, “किती अद्भुत क्षण आहे. आभार, तू ते रेकॉर्ड केलेस.”