animal birthday celebration: माणूस आणि प्राणी यांचं नातं केवळ उपयोगापुरतं नसतं, तर त्यात एक भावनिक जिव्हाळा दडलेला असतो. जेव्हा एखादा प्राणी आपल्या कुटुंबाचा भाग बनतो तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल वाटणारे प्रेम, आपुलकी व जवळीक शब्दांच्या पलीकडे असते. गावात असो वा शहरात, अनेक ठिकाणी लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना मुलांसारखे वागवतात. त्यांना जेवण देणं, त्यांच्याबरोबर सणासारखे दिवस साजरे करणं हे सर्व त्या मानव-प्राणी बंधनाचं प्रतीक आहे. अशाच एका अनोख्या घटनेनं उत्तर प्रदेशातील एका गावात या प्रेमाचं सुंदर दर्शन घडवलं आहे.
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील सुंगडह गावात एक विलक्षण आणि हृदयस्पर्शी सोहळा पाहायला मिळाला. गावकऱ्यांनी एका म्हशीचा – ‘शेरा’ नावाच्या दोन वर्षांच्या म्हशीचा – वाढदिवस अगदी लग्नासारख्या थाटामाटात साजरा केला. या सोहळ्यासाठी म्हशीचा मालक इस्रार यांनी अक्षरशः लाखोंचा खर्च केला.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘शेरा’च्या वाढदिवसाचा आहे. या व्हिडीओमध्ये गावातील लोक म्हशीच्या वाढदिवसाचे जल्लोषात स्वागत करताना दिसत आहेत. डीजेच्या गाण्यांवर लोक थिरकत आहेत, तर काही जण म्हशीसोबत सेल्फी आणि फोटो घेत आहेत.गावात सगळीकडे हशा, आनंद आणि उत्सवाचं वातावरण पसरलं आहे.
व्हिडीओमध्ये म्हशीला फुलांचे हार, गजरे आणि चमकदार कपड्यांनी सजवलेले दिसते. तिच्या चेहऱ्यावर केकसारखी क्रीम लावलेली आहे आणि लोक सगळीकडे जल्लोष करीत आहेत. मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या उत्सवात भाग घेतला आहे. काही महिला म्हशीसमोर आरती करताना दिसतात, तर काही युवक डीजेच्या बीट्सवर नाचत आहेत. गावात जणू सणासारखे वातावरण आहे.
पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या एक्स @ArunAzadchahal अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी इस्रारच्या म्हशीवरील प्रेमाचे कौतुक केले आहे, “हीच खरी माणुसकी आहे.” असे म्हटले आहे. काहींनी मात्र मजेशीर प्रतिक्रिया करत “माझा वाढदिवस कोणी असा साजरा करणार का?” असं म्हणत हास्याचा वर्षाव केला. काहींनी म्हटलं, “प्रेम फक्त माणसांनाच नाही, प्राण्यांनाही दाखवता येतं.
”या व्हिडिओतून स्पष्टपणे जाणवतं की ग्रामीण भारतात प्राण्यांप्रती असलेलं प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी किती खोलवर रुजलेली आहे. माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं केवळ उपयोगापुरतं मर्यादित नसून, ते भावनांचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे.
