Bus Conductor Saves Passenger: कधी तुम्ही सहाव्या इंद्रियाचा चमत्कार अनुभवलाय का? सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला नक्की वाटेल हो, असं काही खरंच घडतं.

कधी तुम्ही पाहिलंय का, एखाद्या व्यक्तीला धोका पोहोचण्यापूर्वीच दुसऱ्याला त्याची जाणीव होते? अगदी काही सेकंद आधीच मृत्यूला हरवणारी अशी घटना घडली एका बसमध्ये. जी पाहून सगळ्यांचेच डोळे विस्फारले गेले. क्षणभराचा उशीर झाला असता, तर त्या प्रवाशाच्या आयुष्याची दोरी कदाचित तिथेच तुटली असती… पण त्या क्षणी कंडक्टरनं जे केलं, ते कृत्य म्हणजे ‘सहाव्या इंद्रियाचा चमत्कार’ म्हणावा लागेल.

एका सामान्य बसमधला हा प्रसंग… कंडक्टर नेहमीप्रमाणे प्रवाशांना तिकिटं देण्यात व्यग्र होता. बसमध्ये गर्दी होती, लोक आपापल्या सीटवर बसून किंवा उभे राहून प्रवास करीत होते. तेव्हाच कंडक्टरच्या अगदी जवळ उभा असलेला एक प्रवासी अचानक तोल गमावतो आणि बसच्या दरवाजाकडे झुकू लागतो. तो खाली कोसळण्याच्या क्षणीच जणू काही अदृश्य शक्तीनं प्रेरित झाल्यासारखा तो कंडक्टर क्षणात मागे वळतो आणि त्या व्यक्तीचा हात लगेच पकडतो.

सगळं काही सेकंदांच्या आत घडतं आणि त्या परिणामास्तव त्या प्रवाशाचा जीव वाचतो.

आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना घडण्यापूर्वी कंडक्टरचं तोंड पूर्णपणे दुसऱ्या दिशेला होतं. त्याला पडणाऱ्या व्यक्तीकडे पाहायलादेखील वेळ नव्हता. तरीही त्यानं नेमक्या क्षणी, तत्काळ हात पुढे करून त्या माणसाला बसमधून खाली पडण्यापासून वाचवलं.

ही संपूर्ण घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि सध्या सोशल मीडियावर ती जबरदस्त व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. कोणी म्हणतं, “हा कंडक्टर तर सिनेमाचा हीरोच आहे!”, तर कोणी म्हणतं, “देवाचंच रूप आहे हा माणूस!”

काही वापरकर्त्यांनी या घटनेला ‘छठी इंद्रिय का चमत्कार’ असं नाव दिलं आहे. कारण- कंडक्टरकडून इतक्या झपाट्यानं प्रतिसाद दिला गेला की, जणू त्याला आधीच जाणवलं होतं की काहीतरी अनपेक्षित घडणार आहे.

त्या क्षणी बसमधील इतर प्रवासीही चकित झाले. काहींनी तत्काळ दोहोंच्या मदतीसाठी धाव घेतली; पण तोपर्यंत कंडक्टरनं एका झटक्यात परिस्थिती हाताळली होती. जर त्यानं क्षणभराचाही उशीर केला असता, तर ती घटना गंभीर अपघातात रूपांतरित झाली असती.

सध्याच्या काळात जिथे लोक स्वतःच्या कामात व्यग्र असतात, तिथे एका अनोळखी प्रवाशासाठी एवढ्या चपळतेनं स्वत:चा जीव धोक्यात घालणारा हा कंडक्टर खरोखरच समाजासाठी आदर्श ठरला आहे. काही जण तर म्हणत आहेत “हा फक्त मानवी प्रतिसाद नाही, हा ‘सहावं इंद्रिय’ कार्यरत होण्याचा पुरावा आहे.”

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही थक्क व्हाल आणि कदाचित पुढच्या वेळी बसमध्ये बसताना त्या ‘हीरो कंडक्टर’ला शोधण्याचाही प्रयत्न कराल.

येथे पाहा व्हिडीओ