करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन असताना उत्तराखंड पोलिसांनी ऋषिकेश येथील एका गुहेमधून सहा विदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना क्वारंटाइन केले आहे. जवळील पैसे संपल्यामुळे हे सहा परदेशी नागरिक गुहेमध्ये राहत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, उत्तराखंडच्या ऋषिकेशजवळ लक्ष्मण झूला क्षेत्रातील प्रसिद्ध नीळकंठ मंदिरालगतच्या एका गुहेमध्ये हे सहा विदेशी नागरिक लपून राहत होते. १८ तारखेला गुहेमध्ये काही विदेशी नागरिक लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी संध्याकाळी घटनास्थळी पोहोचल्यानंतर आपल्या सर्व सामानासह गुहेमध्ये राहणाऱ्या सहा जणांची पोलिसांनी सूटका केली. पोलिस स्थानकात पोहोचल्यावर, ‘आधी हॉटेलमध्ये राहत होतो. पण पैसे संपल्यामुळे गुहेमध्ये राहावं लागलं’ असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांची क्वारंटाइन केंद्रात रवानगी करण्यात आली. २४ मार्चपासून ते गुहेत राहत होते अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच वैद्यकिय चाचणीमध्ये त्यांच्यात करोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. पण, खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाइन केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या विदेशी नागरिकांमध्ये अमेरिका, फ्रान्स, तुर्की, युक्रेन आणि नेपाळच्या रहिवाशांचा समावेश आहे. यातील तीन महिला आहेत तर तीन पुरुष आहेत.