आपल्या बालपणीच्या सुंदर आठवणींपैकी एक गोष्ट म्हणजे कार्टुन! प्रत्येकाला बालपणी कोणतं ना कोणतं कार्टून आवडतं असे कोणाला ‘मोगली”चा जंगलातला धाडसी प्रवास, तर कोणाला “टॉम अँड जेरी”चं अखंड भांडण. या कार्टुन्स शिवाया आपल्या बालपणीचा सुंदर काळ पूर्ण होऊ शकत नाही. कार्टुन पाहून आपल्या चेहऱ्यावर येणारा तो आनंद, कुतूहल आजही तितकाच ताजा आहे. पण तुम्हाला कोणी सांगितले की त्यांना लहानपणीपासून कधीच कार्टून पाहिलं नाही किंवा कार्टुन म्हणजे काय ते त्यांना माहितच नाही तर? तुम्हाला ते खोटंच वाटेल हो ना. पण दुर्दैव म्हणजे आजही हे अनेक लहानमुलांच सत्य आहे. छत्तीसगडच्या दाट जंगलात राहणारे काही आदिवासी मुलांना कार्टून म्हणजे काय हे माहितच नाही. पण हे चित्र बदलण्याचा प्रयत्न एका सीआरपीएफ जवानाने केला आहे. आपल्या मोबाईलवर जेव्हा या आदिवासी मुलांना पहिल्यांदा कार्टून दाखवले तेव्हा डोळ्यातील चमक आणि आनंदाचे शब्दात वर्णन करता येणार नाही.
छत्तीसगडच्या दाट जंगलातील एका हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सीआरपीएफ कोब्रा बटालियनचा एक जवान आपल्या मोबाईलवरून आदिवासी मुलांना कार्टून दाखवताना दिसतो. एक्सवर (पूर्वी ट्विटर) @KiloMike2 नावाच्या वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अनेक लहान मुले आश्चर्यचकित नजरेने मोबाईलकडे पाहत हसताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की “छत्तीसगडच्या जंगलात प्रथमच कोब्रा जवानाने आदिवासी मुलांना मोबाईलवर कार्टून दाखवलं,” त्या वापरकर्त्याने पुढे लिहिलं, “या मुलांना नक्षलवादामुळे शिक्षण आणि बालपणाचा खरा आनंद गमवावा लागला आहे. आता त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं.”
हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला असून दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर यावरून मोठी चर्चा रंगली. काहींनी हे दृश्य हृदयस्पर्शी म्हटलं, तर काहींनी शहरी मुलांच्या मोबाईलच्या व्यसनाशी तुलना केली.
एका वापरकर्त्याने लिहिलं, “या मुलांकडे मोबाईल नाहीत, हेच चांगलं आहे. नाहीतर तेही शहरी मुलांसारखे स्क्रीनच्या नशेत बुडून गेले असते.” दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, “या मुलांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणाऱ्यांची जबाबदारी कोण घेणार?”
तर आणखी एका वापरकर्त्याने म्हटलं, “कार्टून म्हणजे बालपणाचं सार नाही, ते केवळ डोपामिनचा स्रोत आहे. त्यांना अन्न, पोषण आणि शिक्षणाची गरज आहे, कार्टूनची नव्हे.”
एका प्रतिक्रियेत म्हटलं गेलं — “देवा, या मुलांना नक्षलवाद्यांपासून आणि कार्टून दाखवणाऱ्या सीआरपीएफ जवानांपासूनही वाचव.”.”
