Delhi Man Left Mumbai Within 100 Days: लिंक्डइनवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामध्ये एका तरुणाने १०० दिवसांच्या आत मुंबई सोडून तो दिल्लीला परत का गेला याबाबत सांगितले आहे. देशव नावाच्या या व्यक्तीने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले की, त्याला अनेकदा विचारले जाते की, “तू मुंबईहून दिल्लीला का परत आलास?”. पोस्टमध्ये त्याने नमूद केले आहे की, खूप दिवसांपासून त्याला हा प्रश्न विचारला जात आहे. लोक विनोदाने म्हणत आहेत, “तुला मुंबई आवडली नाही का? तिथे मित्र बनवू शकला नाही का? दिल्लीत तुला तुझ्या काल्पनिक प्रेयसीची आठवण येते का?”
१०० दिवस मुंबईत राहिल्यानंतर…
दिल्लीला परतण्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना या तरुणाने लिहिले की, “सुमारे १०० दिवस मुंबईत राहिल्यानंतर, मी दिल्लीला परत येण्याचा निर्णय घेतला. आणि सत्य हे आहे की, यामध्ये मित्र, भाषा किंवा शहराचा काहीही संबंध नाही.”
तो म्हणाला की, त्याच्या कारकिर्दीसाठी नवीन शहरात जाण्याच्या कल्पनेकडे तो आकर्षित झाला झाला होता, कारण त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचे होते. “पण, मागे वळून पाहताना, तो तर्क योग्य नव्हता”, असे त्याने पोस्टमध्ये कबूल केले आहे.
माझा कम्फर्ट झोन मला…
या तरुणाने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “लोक अनेकदा कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याच्या कल्पनेला रोमँटिक बनवतात. आपल्याला सांगितले जाते की, जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनमधून बाहेर तेव्हाच प्रगती होते. आणि हो, कधीकधी ते खरे असते. पण मला जाणवले की, प्रगती म्हणजे सतत अस्वस्थ राहणे नाही. माझ्यासाठी, माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, माझा कम्फर्ट झोन मला चांगली प्रगती करण्यास मदत करत आहे.”
मुंबई छान नाही, असे नाही
या तरुणाच्या मते, दिल्लीने त्याला आवश्यक असलेली स्थिरता दिली आहे. “असे नाही की, मुंबई छान नाही, ती खरोखरच छान आहे. पण माझ्या बाबतीत मला इतर प्रत्येक गोष्टीशी झुंज न देता कामवर लक्ष केंद्रित करायचे होते. म्हणून, मी परत दिल्लीला आलो आणि याचा मला आनंद आहे”, असे तो म्हणाला.
कम्फर्ट झोन नेहमीच शत्रू नसतो
पोस्टच्या शेवटी त्याने नमूद केले की, “कम्फर्ट झोन नेहमीच शत्रू नसतो. कधीकधी, तो मातीसारखा असतो जो तुम्हाला तुमची मुळे मजबूत करण्यासाठी मदत करू शकतो. मी हे शेअर करत आहे कारण, इतरांनाही यातून अधिक शहाणा निर्णय घेण्यास मदत होऊ शकेल.”