महिलांना खरेदीचे भारी वेड, त्यातही सेल असेल तर विचारायलाच नको. लंडनमध्ये राहणाऱ्या एका महिलेने असेच एका सेलमध्ये ३७ वर्षांपूर्वी एक अंगठी खरेदी केली होती. त्यावेळी ही अंगठी महिलेने केवळ २०० रुपयांना खरेदी केली होती. तब्बल ३७ वर्षे ही अंगठी वापरल्यानंतर एक दिवस अचानक आपण घालत असलेली अंगठी साधी नसून खऱ्या हीऱ्याची असल्याचे तिला कळाले. मात्र इतक्या कमी किंमतीला घेतलेली अंगठी हिऱ्याची असेल यावर तिचा विश्वासच बसेना. मग खात्री कऱण्यासाठी ती सोनाराकडे गेली आणि अंगठीत खरंच २६ कॅरेटचा हीरा असल्याचे समजल्याने ती चकीत झाली.
इतकी किंमती अंगठी विकल्यास किती पैसे येतील याचा अंदाजही या महिलेला नव्हता. त्यामुळे तिने दागिन्यांचा लिलाव करणाऱ्या एका संस्थेशी संपर्क केला. संस्थेमध्ये ही अंगठी विकण्यासाठी लिलाव जाहीर झाला आणि अंगठी खरेदी करण्यासाठी बोली लावण्यात आली. पुढची गोष्ट ऐकून तुम्ही चकीत व्हाल. ही अंगठीची किंमत थोडीथोडकी नाही तर तब्बल ५ कोटी ४६ लाखपर्यंत पोहोचली.
अंगठी घेतली तेव्हा त्याची ओळख पटू शकली नाही कारण त्या हिऱ्याला जुन्या पद्धतीने आकार देण्यात आला होता. हिऱ्यांमध्ये पडणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनामुळे हिऱ्याची पारख केली जाते. मात्र जुन्या पद्धतीने घडविण्यात आलेल्या या हिऱ्यातून प्रकाश परावर्तित होत नव्हता. मात्र सोनाराने ही अंगठी तपासली आणि तो हिरा असल्याचे सांगितल्यावर कोणाचाच त्यावर विश्वास बसेना.
ही अंगठी २ कोटी ५० लाख पाऊंड ते ३ कोटी ५० लाख पाऊंडांना (भारतीय चलनामध्ये २ ते ३ कोटी रुपये) विकली जाईल असे सोनाराने सांगितल्यावर तर ही महिला चकितच झाली होती. आपण इतकी किंमती अंगठी ३७ वर्ष वापरल्याचे तिला इतक्या उशीरा लक्षात आले. शिवाय या अंगठीला लिलावामध्ये ५ कोटींहून अधिक रक्कम मिळाल्याने ही महिला आणखीनच खूश झाली.