दुबईतील सर्वांत उंच व जगप्रसिद्ध इमारत ‘बुर्ज खलिफा’ दिवाळीच्या सोहळ्यात सुवर्ण, केशरी व लाल रंगांच्या झगमगत्या प्रकाशानं उजळून निघाला. या शानदार लाइट आणि लेझर शोने संपूर्ण दुबई स्कायलाइनला नवचैतन्य दिलं. भारतीय सणांची परंपरा, प्रकाशाचं प्रतीक आणि आनंदाचा उत्सव — हे सर्व एका ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यामुळे हजारो पर्यटक, भारतीय प्रवासी व दुबईकर थक्क झाले. या शोनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की, दिवाळीचा आनंद सीमा ओलांडतो आणि प्रकाशाचा हा उत्सव जगभरातील लोकांना एकत्र आणतो.

हा व्हिडीओ दुबईच्या बुर्ज खलिफावरील दिवाळी २०२५ च्या खास लेझर आणि लाइट शोचा आहे. भारतीय सणांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला हा शो दिवाळीच्या थीमवर आधारित असून, ‘फेस्टिवल ऑफ लाईट’ असा संदेश बुर्ज खलिफाच्या संपूर्ण इमारतीवर झळकताना दिसतो.

व्हिडीओमध्ये बुर्ज खलिफा सोनसळी, केशरी व लाल प्रकाशात उजळताना दिसतो. त्यासोबत भारतीय पारंपरिक संगीत आणि ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करणाऱ्या प्रकाशकिरणांचा अनोखा संगम झळकतो. ‘प्रकाशांचा उत्सव आनंद, सुसंवाद व समृद्धी आणतो. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा’, असा संदेश इमारतीवर प्रदर्शित होताच लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ @cgidubai या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर हजारो लोकांने प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी लिहिले “भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे!” “दुबई खरोखरच सर्व धर्म, संस्कृती आणि सणांचा आदर करते!” काहींनी म्हटले, “हे दृश्य पाहून असे वाटले की, आपला देश इथे आहे” तर यूएईचे पंतप्रधान व दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा देताना लिहिले, “हा प्रकाशाचा सण साजरा करणाऱ्या सर्वांना शांती, सुरक्षितता व समृद्धी घेऊन येवो.”

दुबईत अनेक वर्षांपासून दिवाळीचा जल्लोष साजरा केला जातो. शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि सार्वजनिक स्थळं सणाच्या सजावटीनं उजळलेली आहेत. या वर्षी मात्र बुर्ज खलिफाचा हा शो सर्वांच्या मनावर राज्य करीत आहे. भारतीय प्रवासी समुदायासाठी ही दिवाळी अविस्मरणीय ठरली आहे. कारण- परदेशी भूमीवरही भारतीयत्वाचा झगमगता प्रकाश पसरलेला दिसला.