LinkedIn User’s Post On Friend’s Financial Crisis: अलिकडच्या काळात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अनेकजण आर्थिक विषयांवर खुलेपणाने बोलू लागले आहेत. यामध्ये पगार, खर्च, गुंतवणूक आणि जीवनशैली यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. लिंक्डइनवर काही दिवसांपूर्वी डॉ. बिस्वाजीत दत्त बरूआह यांनी आर्थिक नियोजनाबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे व वर्गमित्राचे करिअर आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले आहे.

डॉ. बिस्वाजीत दत्त बरूआह यांनी या पोस्टच्या सुरुवातीला म्हटले आहे की, “माझ्या वर्गमित्राने त्याच्या मुलीच्या कॉलेजसाठी त्याच्या पालकांकडून ८ लाख रुपये घेतले आहे. गेल्या १५ वर्षांत आम्ही दोघांनीही ३ कोटी रुपये कमावले आहेत. मला मी गुंतवलेल्या २.३ कोटी रुपयांतून चांगला परतावा मिळत आहे. पण त्याच्याकडे असलेल्या ऑडीचे मूल्य दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आम्ही एकाच वर्गात होतो. एकाच प्रकारचे शिक्षण घेतले आहे. एकाच रुग्णालयात करिअरची सुरुवात केली आणि सुरुवातीला आम्हा दोघांना तेवढाच पगार होता. पण दोघांमध्ये एकच फरक होता, तो फरक म्हणजे प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारची सायंकाळ.”

दोन मित्रांच्या आर्थिक परिस्थितीतील फरक

याबाबत त्यांनी पुढे सांगितले की, “गेल्या १५ वर्षांपासून प्रत्येक गुरुवारी तो त्याच्या मित्रांना क्लबमध्ये भेटतो. या भेटींमध्ये नव्या कार, परदेश वाऱ्या आणि कोणी कुठे कोणती नवी मालमत्ता खरेदी केली, यावर चर्चा होतात. याच काळात मी अनुभवी आर्थिक मार्गदर्शकांच्या भेटी घेतल्या आणि दर महिन्याला १ लाख रुपये इक्विटी फंडमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली. कोणतीही मीटिंग न चुकवता मी त्यामध्ये १४ टक्क्यांनी कशी वाढ होत गेली हे पाहत राहिलो.”

डॉ. बिस्वाजीत दत्त बरूआह यांनी करिअरला सुरुवात केल्यानंतरच्या १५ वर्षांनी त्यांच्या व मित्राच्या आयुष्यातील फरक स्पष्ट करताना म्हटले की, “१५ वर्षांनंतर त्याच्याकडे मूल्य कमी होत चाललेली कार, ६ टक्के परतावा देणारी एफडी आणि इतर कोणतीही मालमत्ता नाही. पण माझ्याकडे २.३ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, ज्यातून मला १५ लाख रुपये परतावा मिळत आहे. त्याला आजही काम करावे लागते कारण त्याला घर चालवायचे आहे. पण आज माझ्याकडे काम करायचे की नाही याचा निर्णय घेण्याचा पर्याय आहे.”

ती एक महागडी गुलामगिरीच…

आपल्या लिंक्डइन पोस्टच्या शेवटी डॉ. बिस्वाजीत दत्त बरूआह म्हणाले की, “जास्त पगार असणे म्हणजे संपत्ती नव्हे. ती एक महागडी गुलामगिरीच आहे. खरी संपत्ती तीच असते, जेव्हा तुमची गुंतवणूक तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा जास्त परतावा देते किंवा तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी तुमच्यावर कोणासमोर हात पसरवायची वेळ येऊ देत नाही.”

वयाच्या पन्नाशीत पालकांकडून कर्ज

“प्रत्येक गुरुवारच्या सायंकाळी तुमच्याकडे पुढील १५ वर्षात जीवनशैलीवर कसा आणि किती खर्च करायचा याची किंवा पुढील १५ वर्षांत आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवायचे याची चर्चा करण्याचा पर्याय आहे. माझ्या वर्गमित्राने निवडलेल्या पर्यायमुळे त्याला मुलीच्या शिक्षणासाठी पालकांकडून कर्ज घ्यावे लागले. वयाच्या पन्नाशीत पालकांकडून कर्ज घेणे कोणालाच आवडणार नाही. त्यामुळे कोणता पर्याय निवडायचा हे तुमच्या हातात आहे”, असेही त्यांनी शेवटी म्हटले.