आजकाल कपडे, फळे, भाजीपाला ते खाण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी ऑनलाईन ऑर्डर केल्या जातात. लोक ऑनलाइन अॅप्सच्या मदतीने या गोष्टी ऑर्डर करतात. साधारणपणे फूड डिलिव्हरी कंपन्या ग्राहकांच्या गरजांची विशेष काळजी घेत सेवा देत असतात. पण कधीकधी ऑनलाईन ऑर्डरशी संबंधित अनेक विचित्र प्रकरणे समोर येतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमधून समोर आला होता. जिथे एका महिलेने डॉमिनोज या प्रसिद्ध कंपनीतून पिझ्झा ऑर्डर केला होता, मात्र डिलिव्हरी बॉयने तिच्यासोबत असे कृत्य केले की, त्या महिलेला कंपनीकडे आणि पोलिसांकडे तक्रार करावी लागली. या घटनेनंतर कंपनीने डिलिव्हरी बॉयला नोकरीवरून काढून टाकले आहे.
डिलिव्हरी बॉयने महिलेला केले प्रपोज
एका महिलेच्या घरी पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने महिलेचा फोन नंबर काढून तिला मेसेज केला. या मेसेजद्वारे महिलेला डिलिव्हरी बॉयला प्रपोज केला होता. यानंतर संबंधित महिलेने ट्विट करत ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. यावर महिलेने ट्विटरवर डॉमिनोज तसेच उत्तर प्रदेश पोलिसांची मदत मागितली आहे.
महिलेने ट्विटरवर सांगितली संपूर्ण घटना
महिलेने ट्विटरवर ट्विट करत लिहिले की, डॉमिनोजकडून पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला डिलिव्हरी बॉयचा मेसेज आला, त्याने मेसेजमध्ये लिहिले की, माफ करा माझे नाव कबीर आहे. काल मी तुमच्या घरी पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आलो होतो. मला तुम्ही आवडता.’ डिलिव्हरी बॉयच्यास या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत महिलेने लिहिले, ‘मला विचारायचे आहे की, कंपनी डिलिव्हरी बॉयला ग्राहकाचा नंबर आणि पत्ता जाणून त्रास देण्यासाठी पाठवते का? जरी त्या मी आवडत असला तरी, हे अशाप्रकारे सांगण्याचा हा मार्ग नाही. याचा अर्थ त्याने कंपनीला डिलिव्हरीसाठी दिलेल्या नंबरचा गैरवापर केला आहे.
पोलिसांकडे केली तक्रार
कनिष्काने पुढे लिहिले की, ‘मी त्याला आवडते आणि त्याने ते कबुली केले हे इथपर्यंत नाही तर, मी रजिस्टर केलेल्या माझ्या फोन नंबरचा त्याने गैरवापर केला आहे. ग्राहक म्हणून कंपनीने मला फसवले आहे. ही कंपनी कर्मचार्यांच्या मदतीने ग्राहकांचा विश्वास भंग करत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग करत महिलेने लिहिले की, ‘कबीर नावाच्या व्यक्तीकडे माझा नंबर आणि पत्ता आहे. या पोस्टनंतर मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर त्याला कबीर आणि डॉमिनोज कंपनी जबाबदार असेल.
एका व्यक्तीची किती नावे?
डॉमिनोज कंपनीने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. स्क्रीनशॉट शेअर करत तिने पुढे लिहिले की, ‘चॅटवर या व्यक्तीचे नाव कबीर, स्टोअरमध्ये मन्नू आणि ईमेलमध्ये कबीर बबलू आहे. ही व्यक्ती वेगवेगळ्या नावाने काय करत आहे हे तुम्ही समजू शकता. पण डॉमिनोजने मन्नू उर्फ कबीर उर्फ बबलूबद्दल माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी माझा फोन नंबर आणि पत्ता त्यांच्या डिलिव्हरी बॉयला लीक केला आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर आता उत्तर प्रदेश पोलिसांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.
डॉमिनोजने डिलिव्हरी बॉयवर केली कारवाई
ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉमिनोज कंपनीने डिलिव्हरी बॉयवर कारवाई केली आहे. कंपनीने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, कंपनी या घटनेबद्दल चिंतित आहे. डॉमिनोजचे ग्राहकांसोबत अनैतिक वर्तन आणि छळवणुकीविरूद्ध शून्य सहनशीलता धोरण आहे. घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने या प्रकरणाचा तपास केला. डिलिव्हरी बॉयला कंपनीने कामावरून काढून टाकले आहे. याप्रकरणी कंपनी संबंधित अधिकाऱ्यांनाही कॉपरेट करेल.