Mother And Son Emotional Video : कॅन्सरग्रस्त रुग्ण आजाराशी एकटाच लढत नसतो तर संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत लढाईत साथ देत असते. जीवघेण्या आजाराने पीडित व्यक्तीला होणाऱ्या वेदना कुटुंबालाही जाणवत असतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब रुग्णाची काळजी घेत असते. अनेकदा कॅन्सरग्रस्त रुग्णाला अशा काही वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो ज्याचा त्याने विचारही केलेला नसेल. अशा परिस्थितीत रुग्णाची हिंमत वाढवण्यासाठी कुटुंब नेहमीच पुढे येते. अशा प्रकारे एका मुलाने आपल्या कॅन्सरग्रस्त आईची हिंमत वाढवण्यासाठी असे काही केले जे पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओतील आई- मुलामधील हे क्षण अगदी निशब्द करणारे आहेत.

इन्स्टाग्रामवर @guido.magalhaes या अकाउंटवर कॅन्सरग्रस्त आईचा आणि मुलाचा एक भावनिक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील मुलगा ब्राझीलचा रहिवासी असून तो पेशाने एक हेअर ड्रेसर आहे. व्हिडीओमध्ये तुम्हा पाहू शकता की, तो कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आईचे केस कापताना दिसत आहे. कॅन्सरशी लढा देणाऱ्या रुग्णावर केमोथेरपीने उपचार केले जातात. या वेळी रुग्णाचे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. अशा परिस्थितीत अनेक रुग्ण डोक्यावरील सर्व केस काढून टाकतात. या मुलाची कॅन्सरग्रस्त आई क्लॉडिया हिनेही तेच केले.

हेही वाचा : तहानलेल्या कासवाने पाणी पाजणाऱ्या महिलेवर केला हल्ला; थरारक Video एकदा पाहाच

कॅन्सरग्रस्त आईसाठी मुलानेही कापले केस

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, केस कापण्यासाठी कॅन्सरग्रस्त आई मुलाच्या सलूनमध्ये पोहोचली. या वेळी मुलाने ट्रिमरने आईचे केस कापण्यास सुरुवात केली. या वेळी आईच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. जे पाहून मुलालाही वाईट वाटत होते, पण त्याने ते चेहऱ्यावर अजिबात जाणवू दिले नाही. या वेळी आईचा हुरूप वाढवण्यासाठी मुलानेही काही विचार न करता आपल्या डोक्यावर ट्रिमर चालवला आणि पूर्ण टक्कल केले. आईने मुलाला पाहिले तेव्हा ती खूप भावनिक होत आणखी जोरात रडू लागली आणि त्याला तू तुझे केस नको कापूस, असे सांगू लागली. पण त्याने न ऐकता आईला थोडा धीर मिळावा यासाठी स्वत:चेही केस कापले. इतकेच नाहीतर या भावनिक क्षणी त्याच्या सलूनमधील मित्रांनीही त्याला साथ दिली आणि त्यांनीही ट्रिमरने आपले केस कापले. या हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून अनेकांना अश्रू आवरणे कठीण होत आहे. कारण अनेक जण आज या जीवघेण्या आजाराचा सामना करत आहेत, त्यामुळे असे अनेक वाईट प्रसंग त्यांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आठवत आहेत.

या व्हिडीओला जवळपास पाच कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट्स करत मुलाचे कौतुक केले आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटले की, एका आईसाठी यापेक्षा सुंदर आधार कोणताच असू शकत नाही. त्याने हा व्हिडीओ आपल्या मुलांनाही दाखवल्याचे सांगितले आहे. तर आणखी एका यूजरने कमेंट करत म्हटले की, स्त्रीमध्ये एक वेगळीच ऊर्जा असते जी सर्वत्र पसरत आहे. काहींना हा व्हिडीओ पाहून अश्रू आवरणे कठीण होत आहे.