Panjab Flooding Viral Video Fact Check : ‘लाइटहाऊस जर्नलिझम’ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला पुराचा एक व्हिडीओ आढळला. व्हिडीओमध्ये लोक छातीपर्यंत साचलेल्या पाण्यात अन्न वाटप करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पंजाबमधील पुराच्या परिस्थितीचा असल्याचा दावा करण्यात येत होता. तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ भारतातील पंजाबचा नसून बांगलादेशचा आहे.

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर @mazhar4justice ने हा व्हिडीओ त्याच्या प्रोफाइलवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये “ज्यांची एकेकाळी भाजपा आणि आरएसएसने प्रचारावर कोट्यवधी रुपये खर्च करून बदनामी केली होती, तेच आज पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करत आहेत. दरम्यान, मदतकार्यात भाजपा आणि आरएसएस कुठेही दिसत नाहीत”; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.

इतर सोशल मीडिया युजर्सही हाच व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा करत शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओमधून स्क्रिनशॉट घेऊन रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

आम्हाला हा व्हिडीओ २७ ऑगस्ट २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला आढळला.

या रीलचे कॅप्शन बंगाली भाषेत आहे.

आम्हाला हा व्हिडीओ २५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगला व्हिजन न्यूजच्या फेसबुक पेजवरही अपलोड केलेला आढळला. हे बांगलादेश-आधारित मीडिया हाऊसचे पेज आहे.

https://www.facebook.com/watch/?v=1026049645380406&rdid=oH8GRJOwbKKYccg3

कॅप्शनमध्ये लिहिले होते – मदरसाचे विद्यार्थी पुन्हा देशाच्या गरजू लोकांसाठी पुढे आले आहेत. छातीपर्यंत पाण्यातून ते इतरांना मदत पोहोचवत आहेत.

आम्हाला हा व्हिडीओ बांगलादेशातील एका यूट्यूब चॅनेलवरही अपलोड केलेला आढळला. हा व्हिडीओ एका वर्षापूर्वी अपलोड करण्यात आला होता.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, पुरामध्ये अडकलेल्या लोकांसाठी अन्न घेऊन पोहोचले.

निष्कर्ष – बांगलादेशमधील पुराच्या वेळी अन्न वाटप करतानाचा जुना व्हिडीओ, पंजाबमधील सध्याचा असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.