foreigners women video: भारतातील स्वच्छता आणि नागरी जबाबदारी या विषयावर एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. परदेशी पर्यटकाने अनुभवलेली एक साधी घटना पण त्यातून उघड झालेले वास्तव, भारतीय समाजाच्या स्वच्छतेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. “कचरा कुठे टाकायचा?” या एका प्रश्नावरून सुरू झालेली चर्चा आता देशभरात चर्चेचा विषय बनली आहे.

इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर @amina_finds हिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती भारतातील एका छोट्या दुकानातून आईस्क्रीम विकत घेताना घडलेला अनुभव सांगते. आईस्क्रीम उघडल्यावर तिने दुकानदाराला विचारले की, “कचरा टाकण्यासाठी डस्टबिन कुठे आहे?” यावर त्या दुकानदाराने बाहेर बोट दाखवत सांगितले “तिथे टाका,” म्हणजेच रस्त्यावरच कचरा फेकण्याचा इशारा केला.

या व्हिडीओत अमिना स्वतःच आश्चर्याने म्हणताना दिसते की, “त्याने मला प्रत्यक्षात रस्त्यावर कचरा टाकायला सांगितले.” तिच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव असतात. “काही लोक असे का असतात?” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं होतं आणि हा व्हिडीओ काही तासांतच व्हायरल झाला. हजारो likes आणि शेकडो कमेंट्स मिळालेल्या या पोस्टने पुन्हा एकदा भारतातील ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि नागरिकांच्या स्वच्छतेविषयीच्या जाणीवेवर चर्चा रंगवली आहे.

पाहा व्हिडिओ

काही वापरकर्त्यांनी दुकानदाराचे समर्थन केले आहे. एकाने लिहिले, “तो नंतर सगळा कचरा एकत्र करून साफ करतो, तुम्ही इतके रागवू नका.” दुसरा म्हणाला, “भारतात स्वच्छ राहणं म्हणजे अपराध आहे.” अशा प्रकारच्या प्रतिक्रियांनीही या वादात आणखी तणाव निर्माण केला. मात्र, अनेकांनी अमिनाचे समर्थन केले आणि लिहिले, “थोडेसे प्रयत्न केले तर डस्टबिन ठेवणे अवघड नाही,” तर एका वापरकर्त्याने म्हटले, “मला माझा देश आवडतो, पण अशा गोष्टी खरंच लाजिरवाण्या वाटतात; ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.”

या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ‘स्वच्छ भारत अभियान’सारख्या उपक्रमांची परिणामकारकता आणि जनजागृतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावरून उमटणाऱ्या या मतप्रवाहातून हे स्पष्ट होते की, शहरं आणि गावं स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ सरकारच्या उपक्रमांवर नव्हे तर नागरिकांच्या मानसिकतेतही बदल घडवण्याची अत्यंत गरज आहे.