scorecardresearch

माजी मुख्यमंत्री थार घेऊन बर्फवृष्टी होणाऱ्या गुलमर्गला गेले; आनंद महिंद्रा म्हणाले, “यापूर्वी कधीच…”

या मुख्यमंत्र्यांकडे अनेक एसयुव्ही गाड्या आहेत. ज्यामध्ये जगातील सर्वात महागड्या गाड्यांचाही समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री थार घेऊन बर्फवृष्टी होणाऱ्या गुलमर्गला गेले; आनंद महिंद्रा म्हणाले, “यापूर्वी कधीच…”
ट्विटरवरील हे फोटो सध्या चर्चेत आहेत (फोटो सौजन्य ट्विटर)

राजकारण आणि आरोप प्रत्यारोप वगळता बातम्यांमध्ये असणारे फार कमी नेते देशात आहेत. अशाच नेत्यांपैकी एक आहेत ओमर अब्दुल्ला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असणारे ओमर अब्दुल्ला हे सोशल नेटवर्किंगवरुन अनेक गोष्टींबद्दल मत व्यक्त करत असतात. नुकतीच त्यांनी केलेली एक हटके पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

खरं तर ओमर अब्दुल्ला हे एसयुव्ही गाड्यांचे मोठे चाहते आहेत. त्यांच्याकडे लॅण्ड रोव्हर, रेंज रोव्हर आणि टोयोटा लॅण्ड क्रूजरसारख्या महागड्या एसयूव्ही आहेत. नुकतीच त्यांनी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राची थार ही गाडी विकत घेतलीय. या गाडीच्या स्पोर्टी लूक बरोबरच तिची रस्त्यावरील दमदार पकड आणि परफॉरमन्समुळे ती कारप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरते. याच थार गाडीचे काही फोटो ओमर अब्दुल्ला यांनी शेअर केलेत.

या फोटोंमध्ये ओमर अब्दुल्ला हे त्यांच्या नव्या महिंद्रा थारसोबत दिसत आहेत. ओमर अब्दुल्ला आपली नवीन थार घेऊन गुलमर्गला गेले होते. जम्मू काश्मीरमध्ये सध्या बर्फवृष्टी होत आहे. सध्याचा काळ हा येथे सर्वाधिक बर्फवृष्टीचा आहे. अशातच ओमर अब्दुल्ला हे लाँग ड्राइव्हसाठी आपली नवी थार घेऊन निघाले. या फोटोंमध्ये बर्फच बर्फ दिणाऱ्या रस्त्यावरुन थारने ओमर अब्दुल्ला यांना चांगलीच जॉय राइड दिल्याचं दिसत आहे. ओमर अब्दुल्लांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ते समोर उभे असून मागे थार गाडी दोन्ही बाजूने बर्फ असणाऱ्या रोडवर उभी असल्याची दिसतेय.

फोटोच्या कॅप्शनमध्ये माजी मुख्यमंत्री या गाडीचं कौतुक करताना दिसत आहेत. बर्फ साचलेल्या रस्त्यांवरुनही या गाडीच्या ड्रायव्हिंग पॉवरमुळे प्रवास सुखकर होतो असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय. नवीन थार घेऊन सकाळी सकाळी गुलमर्गला जाण्यासारखं सुख नाही, अशा अर्थाची कॅप्शन या फोटोंना ओमर अब्दुल्ला यांनी दिलीय.

या ट्विटवर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनीही रिप्लाय दिलाय. आपण याबद्दल सहमत असल्याचं ते म्हणालेत. “यापूर्वी कधीच याहून अधिक खरी गोष्ट बोललीच गेली नाहीय,” अशा अर्थाचा रिप्लाय मंहिद्रा यांनी ओमर अब्दुल्लांचं ट्विट कोट करुन रिपोस्ट करताना दिलाय.

थार गाडी ही २०२० मध्ये लॉन्च झाली असून याच गाड्या आनंद महिंद्रांनी मध्यंतरी काही तरुण क्रिकेटपटूंना भेट म्हणून दिल्या होत्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former cm omar abdullah appreciates his new mahindra thar in snow anand mahindra agrees scsg

ताज्या बातम्या