Viral Video : पुण्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. पुण्यातील विविध विचित्र घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान आता पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. व्हिडीओमध्ये काही लोक कपडे काढून एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. असे म्हटले जाते की, ही लढाई फक्त हॉर्न वाजवण्यावरून सुरू झाली होती, परंतु लवकरच लोकांनी दगडांनी एकमेकांचे डोके फोडण्यास सुरुवात केली. ही लढाई पाहून वापरकर्त्यांना WWE च्या लढतीची आठवण झालीय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
फक्त हॉर्न वाजवला म्हणून फ्रीस्टाईल माराहाण
या भांडणाचा व्हायरल व्हिडिओ २९ एप्रिल रोजी ‘घर के कलेश’ नावाच्या एक्स(पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओ अपलोड होताच तो सोशल मीडियावर वेगाने पसरला आणि लोकांनी तो पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. या व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ही घटना पुण्यातील भवानी पेठ परिसरातील आहे. व्हिडिओमध्ये दोन गट एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. फक्त वादाचे रूपांतर इतक्या धोकादायक लढाईत होईल याची कल्पना कोणीही केली नव्हती. व्हिडिओमध्ये अनेक लोक एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हॉर्न वाजविल्याच्या वादातून टोळक्याने भाऊ-बहिणीला बेदम मारहाण केल्याची घटना भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरात घडली. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत तिघे जण जखमी झाले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.