Divorce jewellery Trend : असं म्हणतात नातं जोडणं थोड सोपं असतं, पण ते निभावणं फार अवघड असतं. आजकाल लोकांना अगदी शुल्लक कारणांवरून राग येतो. अनेकदा या रागाचे रुपांतर भांडणात आणि नंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. यामुळे भारतातच नाही तर जगभरात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. घटस्फोट हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक कठीण प्रसंग असतो. मात्र, मागील काही वर्षांपासून घटस्फोटानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याचा ट्रेंड हल्ली वाढतोय. बॉलीवूडच्या ‘लव्ह आज कल’ आणि ‘चोर बाजारी’ चित्रपटातही ‘ब्रेक अप पार्टी’ नावाची एक नवी संकल्पना मांडण्यात आली होती, जी भारतीयांसाठी फार नवीन होती. यात आता घटस्फोटासंबंधित नवा ट्रेंड समोर आला आहे, ज्याला ‘डायवोर्स रिंग’ या नावाने ओळखले जात आहे.
अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री एमिली रताजकोव्स्कीने हा ट्रेंड आणला आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्याच्या अंगठीला ‘डायवोर्स रिंग’मध्ये बदलले. एमिली रताजकोव्स्कीने २०२२ मध्ये अभिनेता-निर्माता सेबॅस्टियन बेअर-मॅकलार्डला घटस्फोट दिला. विभक्त झाल्यानंतर एमिली आता तिच्या आधीच्या वैवाहिक जीवनाबद्दल उघडपणे बोलत आहे. अभिनेत्रीने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या साखरपुड्याच्या अंगठीला नवे रूप देत ‘डायवोर्स रिंग’मध्ये बदलल्याचे दाखवत आहे.
अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री एमिली रताजकोव्स्कीने एका मुलाखतीत सांगितले की, ही रिंग तिच्या वैयक्तिक आयुष्याचे प्रतिनिधित्व करते. घटस्फोटानंतर स्त्रीच्या आयुष्यातून पुरुष निघून जात असला म्हणून त्या स्त्रीने तिच्या हातातील हिऱ्याची अंगठी काढण्याची गरज नाही, असे मला वाटते. जोडीदारापासून विभक्त झाल्यानंतरही तुम्हाला लग्नाची अंगठी दागिन्यांच्या बॉक्समध्ये बंद करून ठेवायची नसेल तर तुम्ही तिला ‘डायवोर्स रिंग’मध्ये बदलण्याचा पर्याय निवडू शकता.
पण, रताजकोव्स्कीने इन्स्टाग्रामवर डायवोर्स रिंगसंदर्भात पोस्ट करण्याआधीपासूनच पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना वाढताना दिसतेय. न्यूयॉर्कमधील अनेक ज्वेलरी स्टोअर्स गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्या ग्राहकांसाठी ब्रेकअप आणि घटस्फोटाचे प्रतिनिधित्व करणारे दागिने बनवत आहेत. दागिने हे आत्म-अभिव्यक्तीचा एक मजबूत प्रकार आहे.
‘डायवोर्स रिंग’ ट्रेंड नेमका काय आहे?
‘डायवोर्स रिंग’ हा ट्रेंड जरी नवीन असला तरी यातून आपल्याला घटस्फोट आणि विभक्त होण्याच्या पद्धतीत काळाप्रमाणे बदल झाल्याचे दिसून येत आहेत. घटस्फोट किंवा विभक्त झाल्यानंतर दुःखी किंवा समाजात आता मी तोंड कशी दाखवू, असा विचार न करता काही लोक त्याचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.
काही जण घटस्फोटाकडे आपल्या आयुष्यातील नव्या आणि चांगल्या प्रवासाची सुरुवात असल्याप्रमाणे पाहू लागले आहेत. जोडीदाराकडून होणारा मानसिक, शारीरिक त्रास, गैरवर्तन, भावनिक अनुपलब्धता असे असले तरीही बरेचदा लोक लग्नाला किंवा नातेसंबंधांना चिकटून राहतात, पण आता अनेक गोष्टी बदलल्या. ज्या पती-पत्नीच्या नात्यात वाईट अनुभवांचा सामना करणारे लोक अशा नात्यांकडे केवळ गरज म्हणून पाहतात, अशी माहिती मुंबईतील समुपदेशक मानसशास्त्रज्ञ ऍब्सी सॅम यांनी इंडिया टुडेला दिली.
घटस्फोटानंतर वाईट नात्यातून अखेर सुटका झाल्याच्या आनंदात लोक कुठे केक कापत तर कुठे पार्टीचे आयोजन करताना दिसत आहेत, पण ही आता आश्चर्यकारक गोष्ट राहिलेली नाही. यात भर म्हणून आता ‘डायवोर्स रिंग’चा ट्रेंड सुरू झाला आहे.
घटस्फोट ही कोणासाठीही एक तणावपूर्ण घटना असते, त्यामुळे त्याचा आनंद कोण कसा काय साजरा करू शकतो, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. पण, घटस्फोट घेणारे लोक सेलिब्रेशन करून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात की, आता मी माझ्या आयुष्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी मी आजपासून सुरुवात करत आहे, असे सॅम सांगतात. यामुळे डायवोर्स रिंग किंवा सेलिब्रेशन हा कोणत्याही नव्या सुरुवातीचा चांगला पर्याय असू शकतो.
घटस्फोट हा अनेकांसाठी धाडसी निर्णय आहे. दागिन्यांच्या रूपात तो स्वीकारणे हे केवळ आत्म-सशक्तीकरणाचे आणि पुढे जाण्याचे प्रतीक नाही, तर दागिने हे वैवाहिक ऐक्याचे एक आवश्यक पैलू आहे. मंगळसूत्राप्रमाणे अंगठी लग्नात शोभेचे प्रतीक आहे, त्यामुळे या अंगठीबरोबरच्या आठवणीही तितक्याच सन्मानाने पुसल्या गेल्या पाहिजेत.
या ट्रेंडबाबत रताजकोव्स्की म्हणाली की, घटस्फोटानंतर या नव्या रिंगमुळे मी आता स्वतंत्र होत माझे जीवन पुन्हा माझ्या स्वतःप्रमाणे जगू शकते.
‘डायवोर्स रिंग’चा ट्रेंड फॉलो कसा केला जाऊ शकतो?
लग्नाच्या अंगठ्यांप्रमाणेच घटस्फोटाच्या अंगठीचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीशः बदलणारे आहे. यावर ज्वेलरी डिझायनर एना जे सिंग म्हणाल्या की, घटस्फोटाच्या अंगठीची संकल्पना चांगली आहे. या ट्रेंडद्वारे लोक घटस्फोटानंतर आपल्या हातातील अंगठी रीसेट आणि रीस्टाईल करून घेताना दिसत आहेत.
यासाठी अंगठी तुमच्या ज्वेलर्सकडे घेऊन जा आणि ती पुन्हा रीस्टाईल करा, जेणेकरून ती तुमच्या साखरपुड्यातील अंगठीसारखी दिसणार नाही. तुम्ही ती अंगठी तुमच्या डाव्या हातात घालण्याऐवजी उजव्या हातात घाला. तुम्ही त्या अंगठीतील खड्यापासून डायवोर्स पेंडेंट बनवू शकता, हा देखील एक मजबूत ट्रेंड बनू शकतो.
डायवोर्स रिंग म्हणजे तुम्ही मूळ अंगठी बदलण्याची गरज नाही. पण, तुम्हाला वाटल्यास तुम्ही तुमची लग्नाची अंगठी विकू शकता आणि आयुष्याच्या नव्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून नवीन अंगठी खरेदी करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही ती अंगठी देऊन वेगळ्या आकाराची अंगठी खरेदी करु शकता. तसेच तुम्ही त्यापासून ब्रेसलेट बनवू शकता, जे तुमच्या हातात कायम असेल व ज्याकडे तुम्ही स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून पाहाल.