ऑफिसमध्ये स्विमिंगपूल, मसाज रुम, बास्केटबॉल आणि बॅडमिंटन कोर्ट हे सगळं स्वप्नवत वाटणारं असलं तरीही गूगलनं आपल्या ऑफिसमध्ये ते प्रत्यक्षात करुन दाखवले आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी गूगलने आपल्या लंडनमधील नव्या ऑफीसमध्ये अनेक सुविधा देत कर्मचाऱ्यांना खूश केले आहे.
कंपनीने आपली इतकी काळजी घेतली तर हे कर्मचारीही चांगला परफॉर्मन्स का नाही देणार? त्यामुळे गूगलचा दिवसेंदिवस बदलत असलेला चेहरा-मोहरा हे त्याचेच यश आहे असे म्हणायला हरकत नाही. हल्ली ऑफीस हे जवळपास दुसऱ्या घरासारखेच असते. कारण दिवसातला सर्वाधिक काळ आपण ऑफीसमध्येच असतो. मग हेच ऑफिस काम करण्याच्यादृष्टीने जास्त आरामदायी असेल तर? गूगलने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा आणि सोयीचा विचार करत त्यांना अतिशय उत्तम सुविधा ऑफिसमध्येच उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्यामुळे कामातून येणारा ताण घालविण्यासाठी याठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत.
या गूगलच्या हेडक्वार्टरचा खर्च तब्बल ८३०० कोटी रुपये इतका येणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. लंडनमधील हे अतिशय भव्यदिव्य हेडक्वार्टर पाहण्यासारखे असेल. याठिकाणी ट्रीमट्रेलचा २०० मीटरचा ट्रॅकही करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या फिटनेसच्यादृष्टीने ही कंपनीने ही सुविधा केली असल्याचे बोलले जात आहे. बॅडमिंटन कोर्ट आणि फूटबॉल कोर्टमध्ये कर्मचाऱ्यांना खेळण्याबरोबरच त्यांचा खेळ बघण्यासाठी येणाऱ्यांच्या बैठकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय ऑफीसच्या टेरेसवर ३०० मीटरचे गार्डन आणि रनिंग ट्रॅक तसेच रिलॅक्सेशन एरियाही कऱण्यात आला आहे. थॉमस हीथविर्क या प्रसिद्ध डिझायनरची लंडनमधील इमारतीचे डिझाईन कऱण्यासाठी नियुक्ती कऱण्यात आली आहे. कॅलिफोर्नियामधील इमारतीचे डिझाईनही त्यानेच केले होते.