आजी-आजोबा आणि नातवंडांचे नाते अगदी मैत्रीपूर्ण आणि विलक्षण असते. आजी-आजोबा हे मुलांचे पहिले मित्र असतात. पण, हळूहळू आजी-आजोबा वृद्ध होतात आणि त्यांना होत असलेल्या आरोग्याच्या विविध त्रासांमुळे नातवंडांबरोबर पूर्वीप्रमाणे वेळ व्यतीत करणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांनाही त्यांची खूप आठवण येत राहते. मुले आपल्या मित्र-मैत्रिणींना जेवढी ‘मिस’ करतात तेवढीच ती आपल्या आजी-आजोबांनाही ‘मिस’ करीत असतात. अनेकदा आजी-आजोबा घरात असतात; पण ते असूनही घरात नसल्यासारखे जाणवतात. कारण- आजारपणामुळे थकल्याने लहानपणी त्यांच्याबरोबर खेळणारे आजोबा आता खूप कमी बोलतात आणि एका जागी शांत बसून असतात. अशाच प्रकारचा अनुभव गेली पाच वर्षे एका तरुणीला येत होता. स्मृतिभ्रंश झाल्याने तिच्या आजोबांना कुटुंबातील सदस्यांना ओळखणे शक्य होत नव्हते. मात्र, पाच वर्षांनी अचानक त्यांना आपल्या नातीचे नाव बरोबर आठवले; जे ऐकून तिला इतका आनंद झाला की, ती त्यांना मिठी मारून ढसाढसा रडू लागली. सगळ्यांना भावूक करणाऱ्या या क्षणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत नातीचे आपल्या आजोबांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. स्मृतिभ्रंश हा आजार खूप धोकादायक आजार मानला जातो. या आजारात व्यक्ती काही गोष्टी हळूहळू विसरू लागते. ती अनेकदा स्वतःसंबंधित गोष्टीही विसरते. तसेच ती व्यक्ती त्याच्या प्रियजनांना, त्याच्या मुलांना आणि अगदी कुटुंबातील इतर सदस्यांनाही विसरते. डिमेंशिया या स्मृतिभ्रंशाच्या स्थितीमुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनाही खूप अडचणी येतात.

आजोबांना पाच वर्षांनी आठवले नातीचे नाव

व्हायरल व्हिडीओमध्ये सांगण्यात आले की, वृद्ध आजोबांना स्मृतिभ्रंशाची समस्या होती. पाच वर्षांपासून ते सर्व काही विसरले होते. कोणाचे नावही त्यांना नीट आठवत नव्हते. मात्र, अचानक एक दिवस त्यांना नातीची आठवण झाली. त्यांनी नातीचे बरोबर नाव उच्चारले; जे ऐकून नात एवढी खुश झाली की, ती आजोबांना मिठी मारून रडू लागली. तिने आजोबांना विचारले की, त्यांनी तिला ओळखले का; ज्यावर ते हो म्हणाले. त्यानंतर तिला मिठी मारत तिच्या कानात ते तिचे नाव कुजबुजले. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलीचे नाव एंबर्ली आहे. या व्हिडीओतून आजोबा आणि नातीमधील अतिशय भावनिक असा क्षण पाहायला मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यावर अनेकांनी कमेंट्स करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने लिहिलेय की, ज्याच्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती या आजाराने ग्रस्त नाही; तो या मुलीचे सुख-दु:ख समजू शकत नाही. हा प्रसंग पाहून डोळ्यांत अश्रू आल्याचे एकाने सांगितले. तिसऱ्या एका युजरने लिहिले की, हा भावनिक क्षण आहे; पण त्याचा व्हिडीओ बनवण्याची काय गरज आहे!