Typing World Record : एखादा रेकॉर्ड करणे ही काही छोटी गोष्ट नाही; विशेषतः जेव्हा तो वर्ल्ड रेकॉर्ड असतो. पण जगभरातील अनेक विविध प्रकारचे रेकॉर्ड करून सर्वांना आश्चर्यचकित करीत असतात. अनेक जण असे काही अनोखे रेकॉर्ड करतात की, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं. त्यातच जगात अनोखी कामगिरी करीत वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणाऱ्यांच्या यादीत आणखी एका भारतीय व्यक्तीचं नाव सामील झालं आहे. या व्यक्तीनं हाताच्या बोटांनी नाही, तर चक्क नाकानं २५.६६ सेकंदांत कॉम्प्युटरच्या की-बोर्डवरील अल्फाबेट्स टाईप करून नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. यासंबंधीचा एक व्हिडीओ आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं (Guinness World Records) त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे; जो पाहिल्यानंतर तुमचाही विश्वास बसणार नाही की, अशा प्रकारेही कोणी टायपिंग करू शकतं.
नाकानं टायपिंग करून वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या या व्यक्तीचं नाव विनोद कुमार चौधरी (वय ४४), असं आहे. यापूर्वी २०२३ मध्येही त्यानं नाकानं की-बोर्डवरील अल्फाबेट्स टाईप करण्याचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ बनवला होता. यावेळी त्याला २७.८ सेकंदांचा वेळ लागला होता. त्याच वर्षी त्यानं २६.७३ सेकंदांच्या वेळेसह पुन्हा आपला विक्रम मोडला.
विनोद कुमार चौधरीनं आता तिसऱ्यांदा नाकानं की-बोर्डवरील अल्फाबेट्स टायपिंग करण्याचा स्वत:चा रेकॉर्ड मोडला आहे. त्यानं २५.६६ सेकंदांत ही अविश्वसनीय कामगिरी केली.
रेकॉर्डच्या नियमांनुसार, चौधरी यांना रोमन वर्णमालेतील सर्व २६ अक्षरं मानक QWERTY की-बोर्डवर टाईप करायची होती; ज्यामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये एक स्पेस ठेवायचा होता. पण, अशा प्रकारे विनोदच्या नावे एकच वर्ल्ड रेकॉर्ड नाही, तर त्यानं याआधी सर्वांत जलद वेळेत एका हातानं अल्फाबेट्स टाइप करण्याचा रेकॉर्डही केला आहे; ज्यासाठी त्याला ५.३६ सेकंदांचा अवधी लागला होता.
‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने व्हिडीओ केला शेअर
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’नं ‘एक्स’ (पूर्वीचं ट्विटर)वर या रेकॉर्डचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, “तुम्ही तुमच्या नाकानं किती वेगानं अक्षरं टाईप करू शकता (स्पेससह)? हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.