यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे खूप कठीण बाब आहे. अनेक उमेदवार आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या परीक्षेत खूप मेहनत घेतात. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ते जिद्द, मेहनतीसह सतत सराव करतात आणि त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. आज सोशल मीडियावर आयएएस अधिकारी सोनल गोयल यांनी परीक्षेची गुणपत्रिका शेअर केली. त्यांच्या आयएएस होण्याच्या प्रवासाचे वर्णन करीत त्यांनी अनेकांना प्रेरित केले आहे
सोनल गोयल यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्यांना अंतिम टप्प्यात म्हणजे मुलाखतीपर्यंत पोहोचता नाही आले. पण, त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडली नाही आणि मे २००८ च्या निकालामध्ये त्यांची अंतिम निवड करण्यात आली. पाहा आयएएस अधिकारी यांनी शेअर केलेली पोस्ट.
यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यंसाठी त्यांनी पुढे संदेश लिहिला आहे की, मला फक्त इच्छुकांना हेच सांगायचे आहे की, माझ्या पहिल्या प्रयत्नात मुख्य विषयाच्या पेपरमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे मला मुलाखतीचा कॉल आला नाही. पण, या गोष्टीने मी खचून गेले नाही. तर दुसऱ्या प्रयत्नात पेपरमध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी मी नोट्स बनवल्या, सराव केला, प्रश्नांची उत्तरे लिहिण्यावर भर दिला आणि स्वतःच्या पहिल्या प्रयत्नात झालेल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न केला.
पोस्ट नक्की बघा :
आयएएस अधिकारी सोनल गोयल यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले. सीएस (CS) कंपनीत सेक्रेटरी म्हणून अर्धवेळ नोकरी करण्याबरोबर त्यांनी परीक्षेचा अभ्याससुद्धा केला. या कष्टाचे फळ म्हणून त्या परीक्षेच्या दुस-या प्रयत्नात केवळ त्या उत्तीर्णच झाल्या नाहीत; तर पेपरमध्ये त्यांना सर्व विषयांत सर्वाधिक गुण मिळाले.
या प्रवासाबद्दल सांगताना त्या पुढे म्हणाल्या, “प्रिय विद्यार्थ्यांनो… अपयश ही शिकण्याची, सुधारण्याची आणि शेवटी जिंकण्याची संधी असते. म्हणून तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. तुमच्या ध्येयांचा पाठपुरावा करा आणि तुमची स्वप्नं नेहमी पूर्ण करून दाखवा. चिकाटीनंच ध्येय प्राप्त होते”, असे त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सोशल मीडियावर @sonalgoelias आयएएस महिला अधिकाऱ्याची पोस्ट पाहून नेटकरी प्रेरित होत आहेत आणि कमेंट्समध्ये त्यांची प्रशंसा करताना दिसून आले आहेत.