ICC Women World Cup 2025 Final: भारतीय महिला क्रिकेट संघानं आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहासात सुवर्णअक्षराने नाव कोरले आहे. शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्याबरोबरच संपूर्ण महिला क्रिकेट संघाच्या जबरदस्त खेळामुळे भारताने ५२ धावांनी विजय मिळवला.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या टीमनं करून दाखवलं. ही भारताची विश्वचषक स्पर्धेतील पहिलीच विजयाची नोंद आहे. भारताच्या लेकींनी इतिहास घडवला याचा आनंद सध्या सोशल मीडियावरही दिसत आहे. नेटकऱ्यांनी संघाचे अभिनंदन करत सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत, आणि इंटरनेटवर मजेदार मीम्सचा माहोल तयार झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले मीम्स आणि पोस्ट्स
हरमनप्रीत कौर आणि शफाली वर्माचा फोटो शेअर @Sarcasm या एक्स अकाउंटवर “सर्व भारतीयांसाठी एक मोठा दिवस… शेवटी हा नोव्हेंबर वेगळा आहे” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
तर “भारताच्या मुलींनी दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषक जिंकला, अभिनंदन मुलींनी इतिहास रचला” अशी कॅप्शन देत मॅचमधील फोटोज शेअर केले आहेत.
तर जिथे महिलांनी इतिहास रचला तिथे रोहित शर्मादेखील उपस्थित होता. भारतीय संघाने जेतेपद पटकावताच रोहित शर्माचे अश्रू अनावर झाले आणि त्याची प्रतिक्रियादेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
@Pinned000 या एक्स अकाउंटवरून “भारतीय महिला वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत. आपण सगळेच आज कबीर खान आहोत” अशी कॅप्शन देत बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा डोळे पाणावलेला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
“अभिनंदन, २५ वर्षांनंतर अखेर आपण विश्वविजेते झालो आहोत, हिंदुस्तान से बेहतर कोई नहीं” अशी कॅप्शन देत @Imrealrishi या एक्स अकाउंटवरून सामन्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
तर चेन्नई सुपर किंग्सच्या एक्स अकाउंटवर “आशेपासून इतिहासापर्यंत! आम्ही वर्ल्डकप घरी आणला” अशी कॅप्शन देत २००५ च्या महिला क्रिकेट वर्ल्डकप सामन्याचा आणि २०२५च्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप सामन्याचा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, भारतानं नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. सध्या सोशल मीडियासह भारताच्या कानाकोपऱ्यात या जेतेपदाचा जल्लोष सुरू आहे.
