नोकरी, कॉलेज यांसाठी अनेक जण दुसऱ्या शहरात जातात आणि तिथे भाड्याच्या घरात राहतात. परंतु, भाड्याने राहायला घर शोधताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भाड्याच्या घरात पाण्याची सोय असेल, तर तिथे वीजपुरवठ्याची समस्या असते. एखादे घर आवडले, तर त्याचे भाडे बजेटपेक्षा जास्त असते, तसेच काही घरांचे भाडे कमी असते; पण तिथला आजूबाजूचा परिसर सुरक्षित नसतो. अशा अनेक समस्या उदभवतात आणि घर भाड्याने घेण्यास बराच कालावधी लागतो. आज सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. बंगळुरूमध्ये एका व्यक्तीला एका दिवसात भाड्याचे घर मिळाले आहे; हे पाहून अनेक जणांना आश्चर्य वाटले आहे.
बंगळुरूचे अनोखे रिक्षाचालक, ट्रॅफिकदरम्यानच्या मजेशीर गोष्टी, तसेच ओला, उबर (Ola and Uber) वाहतूक कंपन्यांचे कमी भाडे घेणे आदी अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. आज या यादीत आणखीन एका गोष्टीचा समावेश होणार आहे आणि ती म्हणजे एका दिवसात व्यक्तीला बंगळुरूमध्ये भाड्याचे घर मिळाले आहे ही घटना. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत अज्ञात व्यक्तीला कशा प्रकारे एका दिवसात घर मिळाले हे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला अज्ञात व्यक्ती गुरुवारी बंगळुरूमध्ये येते. त्यानंतर शुक्रवारी ती कोरमंगला परिसरातील एका दलालाची (Broker) भेट घेते आणि बोलणे करते. शनिवारी व्यक्ती ती जागा निश्चित करते आणि रविवारी ती भाड्याच्या घरात राहायलासुद्धा जाते. बंगळूरमधील मजेशीर प्रकरण एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघाच…
हेही वाचा…चोरी होऊ नये म्हणून दागिने डस्टबिनमध्ये लपवले, जावयाच्या चुकीमुळे ते थेट डंपिंग ग्राऊंडवर गेले, सुदैवाने असे परत मिळाले
पोस्ट नक्की बघा :
एका दिवसात मिळाले भाड्याचे घर :
ग्रेपवाइन (Grapevine) ॲपचे सहसंस्थापक व सीईओ सौमिल त्रिपाठी यांची त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे; ज्यात बंगळूर शहरात भाड्याचे घर शोधणाऱ्या एक व्यक्तीचा मजेशीर प्रवास या पोस्टमधून सांगण्यात आला आहे. या वेगवान प्रक्रियेने बंगळूरच्या रहिवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये गुरुवार ते रविवारी, असे लिहून कोणत्या दिवशी अज्ञात व्यक्तीने काय काय केले हे नमूद करण्यात आले आहे. भाड्याचे घर बंगळुरूमध्ये सहज मिळणे शक्य नाही. त्यामुळे या गमतीशीर घटनेने रहिवाशांचे लक्ष वेधले गेले आहे. तसेच या मजेशीर प्रकरणाला #बंगळुरूक्षण असा नेहमीप्रमाणे हॅशटॅग देण्यात आला आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट ग्रेपवाइन ॲपचे सहसंस्थापक व सीईओ सौमिल त्रिपाठी यांच्या @OnTheGrapevine या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच ही पोस्ट ब्रोकरने तयार करून पोस्ट केली आहे, अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. ब्रोकेरने तयार केलेल्या या पोस्टचा सीईओ सौमिल त्रिपाठी यांनी स्क्रीनशॉट घेऊन त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच सध्या बंगळुरूमध्ये एका दिवसात भाड्याने घर मिळणाऱ्या या मजेशीर प्रकरणाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.