IND Vs NZ : मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेला विश्वचषकातल्या सेमी फायनलाचा सामना डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. भारताने न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवला. या विजयाचे शिल्पकार ठरले विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सात विकेट घेणारा मोहम्मद शमी. या विजयानंतर भारताने विश्वचषकाच्या फायनलमध्ये मुसंडी मारली आहे. याच सामन्यात विराट कोहलीने त्याचं ५० वं शतक झळकवत सचिनचा रेकॉर्डही मोडला. मात्र विराटचं हे शतक एका रेस्तराँ मालकाला चांगलंच महागात पडलं आहे.
उत्तर प्रदेशातल्या बहराईच मध्ये असलेल्या रेस्तराँने एक खास ऑफर दिली होती. विराटचं शतक झाल्यानंतर या ठिकाणी इतकी गर्दी झाली की शेवटी लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बोलवावे लागले. शेवटी रेस्तराँ मालकाने शटर बंद केलं. काय घडला हा प्रकार? जाणून घेऊ.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली सेमी फायनल सुरु होण्याआधी बहरइच येथील लखनवी रसोई नावाच्या रेस्तराँ मालकाने घोषणा केली होती की विराट कोहली सामन्यात जितक्या धावा करेल तितके टक्के बिर्याणीच्या किंमतीवर सूट मिळेल. विराटने १००+ धावांची तडाखेबंद खेळी केली. ज्यानंतर या रेस्तराँ मालकाला ग्राहकांना १०० टक्के सूट देऊन म्हणजेच फ्री बिर्याणी खाऊ घालावी लागली. विराटच्या शतकानंतर बिर्याणी फ्री मिळते आहे हे समजल्यावर लोकांनी या रेस्तराँ बाहेर तोबा गर्दी केली. इतके लोक जमा झाले की त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.

लखनवी रेस्तराँ बाहेर अचानक इतकी गर्दी झाली त्यामुळे मालकाला काय करावं ते सुचेना, त्यामुळे त्याने शेवटी पोलिसांना पाचारण केलं. पोलीस गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र लोकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. शेवटी अंदाजापेक्षा जास्त गर्दी जमा झाल्याने या रेस्तराँच्या मालकाने शटर बंद करत आपलं रेस्तराँ बंद केलं. लखनवी रेस्तराँच्या मालकाने सांगितलं की मी जाहीर केल्याप्रमाणे लोकांना फुकट बिर्याणी दिली. मात्र मला वाटलं होतं त्यापेक्षा कैकपटीने लोक इथे जमा झाले होते.
शोएब यांचं हे रेस्तराँ आहे जे कोतवाली पोलीस ठाण्याच्या भागात येतं. विराटने ५० वं शतक ठोकल्यानंतर रेस्तराँमध्ये फुकट बिर्याणी देण्यास सुरुवात झाली. १०० टक्के सूट देऊन बिर्याणी ग्राहकांना मिळू लागली. ही बाब लोकांमध्ये इतक्या वेगाने पसरली की काही वेळातच या ठिकाणी शेकडो लोक जमा झाले. शेवटी शोएब यांनी बिर्याणी बाहेर आणूनही वाटली. मात्र गर्दी काही कमी होत नव्हती. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. तरीही गर्दीचा उत्साह कमी झाला नाही, मग शोएब यांनी शटर लावत रेस्तराँ बंद केलं.