Indian Railway Viral Video : भारतीय रेल्वे हे जगातील सर्वांत मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. रोज करोडो लोक ट्रेनने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेन हाच उत्तम पर्याय मानला जातो. कमी वेळेत आरामदायी प्रवास होत असल्यामुळे अनेक जण ‘वंदे भारत’सह अनेक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन्सना प्राधान्य देताना दिसतात. दरम्यान, तुम्हीही या ट्रेन्समधून प्रवास करीत असाल, तर तुम्ही ‘रेल्वे ही आपली संपत्ती आहे. तिचे नुकसान करू नका’, अशा उद्घोषणा नेहमी ऐकत असाल. पण, उद्घोषणांकडे दुर्लक्ष करीत काही प्रवासी या संपत्तीचे नुकसान करताना दिसतात. सध्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एसी ट्रेनचे खूप मोठे नुकसान करताना दिसतेय. या घटनेचा व्हिडीओ पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

सर्वच रेल्वे प्लॅटफॉर्मवर हल्ली गर्दुल्ले, भिकारी किंवा मनोविकारग्रस्त असलेल्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेकदा हे लोक प्रवाशांना त्रास देताना, रेल्वेचे नुकसान करताना दिसतात. मात्र, त्यांच्याविरोधात आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. या व्हिडीओमध्येही एक गर्दुल्ला कारवाईला न घाबरता, हातात बांबू घेऊन रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या खिडकीच्या काचा फोडताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स “आता कुठेयत रेल्वे पोलीस अन् टीटी”, असा सवाल उपस्थित करीत आहेत.

हेही वाचा – मुंबईकरांनो जीव एवढा स्वस्त आहे का? लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी तरुणाची धडपड, रुळावर उतरला अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

व्यक्तीने ट्रेनच्या खिडक्यांच्या काचांचा अक्षरश: केला चक्काचूर

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक गर्दुल्ला व्यक्ती हातात मोठा बांबू घेऊन, रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एसी ट्रेनच्या खिडक्यांवर बांबूने हल्ला करीत असल्याचे दिसत आहे. बांबूच्या साह्याने तो खिडक्यांच्या काचा फोडत आहे. एकेक करून त्याने अशा अनेक काचा बांबूने फोडल्या. त्यात खिडक्यांच्या काचांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो हे कृत्य करीत असताना प्लॅटफॉर्मवर एकही रेल्वे पोलीस, टीटी किंवा रेल्वे कर्मचारी उपस्थित नव्हता, तसेच त्याला रोखण्यासाठीही कोणी पोलीस धावत आले नाहीत. अनेक प्रवासीदेखील त्याच्या बाजूने जात होते; पण कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक जण फक्त बघून पुढे जात होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @ghantagram_memes नावाच्या इन्स्टाग्रामवर पेजवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आता अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली; तर काहींनी या व्यक्तीला लोकांनी तरी निदान रोखायला हवे होते, असे म्हटले आहे. तर काहींनी, आता कुठे आहेत रेल्वे पोलीस, टीटी आणि रेल्वेचे कर्मचारी, असा संतप्त सवाल केला आहे. दरम्यान अनेकजण तिकीट न काढणाऱ्यांवर कारवाई होते मग असे कृत्य करणाऱ्यांना काय शिक्षा होणार असा प्रश्नही विचारत आहे.