आपलं ऑफिस जास्तीत जास्त चांगलं असावं असं प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटत असतं. अर्थात अनेकांसाठी ऑफिस म्हणजे दुसरं घर असतं. आपला जास्तीत जास्त वेळ हा ऑफिसमध्येच जातो. तेव्हा ज्या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवतो ती जागा, तिथलं वातावरण सोयी, सुविधा चांगल्या असाव्यात असे आपल्याला वाटत असते. नुकतंच ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने एक सर्व्हेक्षण केलंय. यात भारतातील कोणत्या कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वात चांगल्या आहेत याची यादी दिलीय, तेव्हा जाणून घेऊयात या कंपन्यांविषयी…

‘इंट्यूट’ला मिळाला सर्वात चांगली कंपनी असल्याचा मान

देशातील सर्वात उत्तम ऑफिस असल्याचा मान आयटी कंपनीला मिळाला असून या कंपनीचे नाव ‘इंट्यूट’ असे आहे. या कंपनीत एकूण ९४८ कर्मचारी असून कंपनीची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली आहे. यावर्षी पहिल्या क्रमांकार असणारी ही कंपनी मागील वर्षी १० व्या क्रमांकावर होती. मात्र आपल्या सुविधांमध्ये सुधारणा करत कंपनीने पहिल्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे.

आयटी कंपन्यांची सरशी

जगभरात महिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार होत असताना या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देऊन आकर्षित करत आहेत. येथील एकूण कामाचा ताण आणि कामाचे तास यांचा विचार करता या कंपन्यांमधील वातावरण आणि सुविधा चांगल्या असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या कंपन्यांनी या गोष्टीवर विशेष लक्ष देत कर्मचाऱ्यांना या सुविधा दिल्या असल्याचे दिसते. या सर्वेक्षणानुसार पहिल्या १० कंपन्यांपैकी ७ कंपन्या या आयटी क्षेत्रातील असून पहिल्या क्रमांकाचा मानही आयटीलाच मिळाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणारी गूगल ही पण आयटी कंपनीच आहे. ‘इंट्यूट’ आणि ‘गूगल’शिवाय ‘SAP लॅब्स’, ‘अॅडॉब सिस्टीम’, ‘नेट अॅप’, ‘टेली परफॉर्मन्स’, ‘पिटनी बोज’ या कंपन्यांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे.

असं आहे गूगलचे नवीन ऑफीस…

गूगल तिसऱ्या स्थानावर

गूगल सध्या देशातील सर्वात भव्य ऑफीस असणारी कंपनी मानली जात होती. मात्र या सर्वेक्षणानुसार गूगलला तिसरे स्थान मिळाले आहे. गूगलने नुकतेच लंडनमध्ये आपले नवीन मुख्य ऑफिस बांधले आहे. या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी अतिशय उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. गूगलने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा आणि सोयीचा विचार करत आपल्या ऑफिसची रचना केली आहे. त्यामुळे कामाच्यादृष्टीने हे ऑफिस कर्मचाऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. कामातून येणारा ताण घालविण्यासाठी याठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे गूगलने सांगितले होते.

आयटीशिवाय या आहेत इतर भव्य कंपन्या

‘अमेरिकन एक्सप्रेस’ ही दुसऱ्या क्रमांकावर असणारी कंपनी फायनान्स आणि इन्शुरन्स क्षेत्रातील आहे. तर ‘लेमन ट्री हॉटेल’ ही चौथ्या क्रमांकावर असणारी कंपनी हॉटेल क्षेत्रातील आहे. ‘डीएचएल’ ही कंपनी दहाव्या क्रमांकावर असून ती ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.