Indore Gold House Viral Video : बऱ्याच लोकांना सोन्याचे दागिने घालण्याचे शौक असतो. सोनं हे एक प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं, त्यामुळे महिलाच काय पुरुषही सोन्याच्या दागिन्यांना हमखास पसंती देतात. लोक सणासुदीनिमित्त सोन्याचे नवनवीन दागिने बनवून ठेवतात. कोणाचं लग्न असो, कार्यक्रम असो की ते सोन्याचे दागिने घालून मिरवतात. तुम्ही आतापर्यंत स्वत:साठी सोन्याचे दागिने बनवून घेणारे अनेक लोक पाहिले असतील. परंतु, कधी कोणी घरातील वस्तूही सोन्याच्या बनवून घेतल्यात, असे ऐकले आहे का? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका व्यावसायिकानं खरंच अशा प्रकारे घरातील वॉश बेसिनपासून सॉकेटपर्यंत सर्व वस्तू सोन्याच्या बनवल्या आहेत. या सोन्याच्या घराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सोन्याविषयीची त्याची ही क्रेझ पाहून लोकही आता चकित झालेत. कारण- आतापर्यंत दुबईत अशा प्रकारे लोक छंद म्हणून घरात सोन्याच्या वस्तू वापरताना आपण पाहिलं होतं. पण चक्क इंदूरमधील एक व्यावसायिकानं घरातील फर्निचरपासून वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक सॉकेट्सपर्यंत सर्व काही सोन्यामध्ये बनवून घेतलं आहे. या अनोख्या आलिशान घराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
देशभरातील असामान्य आणि आलिशान घरांचे व्हिडीओ शेअर करणारा प्रसिद्ध इन्स्टाग्राम कंटेट क्रिएटर प्रियम सारस्वत यानं या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियम सारस्वत या घराच्या मालकाकडे आणि त्याच्या पत्नीकडे त्यांचा आलिशान बंगला पाहण्यासाठी परवानगी मागतोय. त्यानंतर ते घर पाहण्यास सुरुवात करतात. यावेळी घराबाहेर अगदी साधा गाईंचा गोठा आहे. त्यानंतर पुढे आलिशान कारचं कलेक्शन नजरेस पडतं, ज्यात १९३६ च्या विंटेज मर्सिडीजसह अनेक आलिशान कार आहेत.
जेव्हा मालकानं प्रियमला त्यांच्या १० बेडरूमच्या आलिशान बंगल्यात नेलं तेव्हा त्या बंगल्याच्या आतील दृश्य आणि भव्यता पाहून प्रियम थक्क झाला. तो म्हणाला की, मला सगळीकडे सोनंच सोनं दिसतंय. त्यावर बंगल्याचा मालक अभिमानानं उत्तर देतो की, हे खरं २४ कॅरेट सोनं आहे. इथे सजावटीच्या वस्तूंपासून ते इलेक्ट्रिकल सॉकेट्सपर्यंत सर्व सोन्याचं दिसेल, जे पाहून प्रियमदेखील चकित झाला.
या घराच्या आवारात गोशाळेसह एक सुंदर बाग आणि टॅरेस आहे. दरम्यान, घरात सोन्यापासून तयार केलेलं एक देवघर आहे.
तुम्ही गरिबीतून श्रीमंतीकडे कसे पोहोचलात?
संपूर्ण बंगल्याचा फेरफटका मारल्यानंतर प्रियमनं मालकाला कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी विचारलं, तेव्हा मालकानं गरिबीपासून श्रीमंतीकडे पोहोचण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास सांगितला. तो म्हणाला की, आमच्या २५ जणांचं कुटुंब होत, त्यात मालकीचा फक्त एकच पेट्रोल पंप होता. नंतर मला जाणवलं की, अशानं जगणं कठीण होईल. म्हणून मी सरकारी कंत्राटाची कामं घेऊ लागलो. आम्ही सरकारसाठी रस्ते, पूल आणि इमारती बांधण्याचे काँन्ट्रॅक्ट घेऊ लागलो. आता आम्ही ३०० रूमचं एक हॉटेल बांधत आहोत, असा माझा जीवनप्रवास आहे.
या व्हिडीओवर आता लोक वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. अनेकांनी या प्रेरणादायी प्रवासाचे कौतुक केले आहे, एका युजरनं लिहिलं की, पेट्रोल पंपापासून हॉटेलपर्यंत खरोखरच प्रेरणादायी प्रवास आहे. दुसऱ्यानं लिहिलं की, हे एखाद्या फिल्मसारखं आहे. तिसऱ्यानं लिहिलं की, कल्पना करा की,तुम्ही अशा घरात राहता जिथे सॉकेटही सोन्याचे आहेत.