Indrayani River Bridge old video: मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. यापैकी चार पर्यटकांचा मृ्त्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. रविवारी रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु होते. सध्या याठिकाणी बचावकार्य थांबवण्यात आले असून ड्रोनद्वारे नदीत आणखी कोणी नागरिक अडकला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीवरील पूलाचा जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की हा पूल का पडला. याचा आधीचा आणि नंतरचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याआधीची परिस्थिती दिसत आहे. हा पूल कधीही पडू शकतो अशी अवस्था त्याची आधीच झाली होती. पुलावर सर्वत्र भेगा पडलेल्या दिसत आहे. सिमेंटच काम खराब झालं असून आतमधलं लोखंडही वर दिसत आहे. तसेच बाजूला पकडायला असलेला लोखंडी खांबही खराब झालेले दिसत आहेत. हा संपूर्ण पूल आधीच कमकूवत झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. याचाच अर्थ पूलाची अवस्था आधीच इतकी धोकादायक झालेली असतानाही पुलावरची वाहतूक थांबवली नव्हती तसेच पुलावरची रहदारी बंद करण्यात आली नव्हती. हे सर्व धोके लक्षात घेऊन पूल बंद केला असता तर ही घटना टळली असती.
पाहा व्हिडीओ
कुंडमळ्यात नेमकं काय घडलं?
रविवारी १५ जून रोजी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंडमळ्यात मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. या पुलावरून पलीकडे मंदिर असून तिथे दर्शनाला जाणाऱ्या-येणाऱ्यांची, तसेच समोरचा पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची कुंडमळ्यातील या पुलावर नेहमीच मोठी गर्दी होते. रविवारीही दुपारी ३.३० च्या सुमारास अशीच गर्दी या पुलावर असतानाच पुल कोसळला आणि भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य चालू होतं.
राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत
राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडमळा येथील दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च शासनातर्फे केला जाईल, असेही ते म्हणाले.