Sikyara Tunnel Rescue : उत्तराखंडमधील सिल्क्यरा येथे बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. काल म्हणजे मंगळवारी रॅट मायनर्स टीमच्या मदतीने शेवटचा भाग हाताने खोदण्यात आला; ज्यानंतर मजुरांना बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत बचाव पथकाच्या धाडसाचे आणि मेहनतीचे कौतुक केले आहे. दरम्यान, देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही बचावकार्यात गुंतलेल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करीत लिहिले की, ही कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आहे. १७ दिवसांपासून ४१ मौल्यवान जीवांना वाचवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानतो. हे यश कोणत्याही खेळातील विजयापेक्षा जास्त अधिक मोठे आहे. तुम्ही सर्वांनी देशाचा उत्साह वाढवला आहे. आपण आम्हाला जाणीव करून दिली आहे की, कोणत्याही बोगद्यातून बाहेर पडणे फार कठीण नाही. सर्वांचे सहकार्य, प्रार्थना आपल्याबरोबर असतील, तर कोणतेही कार्य अशक्य नसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, सर, तुमचं मत बरोबर आहे. या कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला माझा सलाम! यातील प्रत्येकानं खूप चांगलं काम केलं आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, त्या कामगार-कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून छान वाटले. ४१ कामगार, १७ दिवस आणि अनेक प्रार्थना. प्रतीक्षा संपली. भारत महान आहे. तिसऱ्या एका युजरने लिहिले की, दिलासाजनक बातमी. बचावकार्यातील प्रत्येकाला सलाम!