Vadodara Teacher Slap News: कधी कधी शिक्षेच्या मर्यादा ओलांडल्या की, भयंकर परिणाम होऊ शकतो. शिक्षण देताना एका शिक्षकाकडून घडलेल्या घटनेनं सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं आहे. एका साध्या कृतीमुळे आता या शिक्षकाचं आयुष्यच बदलून गेलंय. विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पाच वर्षांपूर्वी सुरू झालेला हा संघर्ष आज एका धक्कादायक वळणावर येऊन ठेपलाय. सोशल मीडियावर लोकांचे संतप्त आणि भावनिक प्रतिसाद येत आहेत… पण नक्की काय घडलं? आणि का आलंय संतापाचं वादळ न्यायालयाच्या या निर्णयावर? जाणून घ्या…
वडोदऱ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका खासगी शिकवणीच्या शिक्षकाने विद्यार्थ्याला कानफटात मारली, आणि त्याबद्दलच त्याला सव्वा लाखाचा मोबदला भरावा लागला. एवढंच नाही, तर थेट सहा महिन्यांचा तुरुंगवासही त्याच्या नशिबी आला. आता या निर्णयावर सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना २३ डिसेंबर २०१९ ची असून, आरोपी शिक्षकाचे नाव जसबीरसिंह चौहान आहे. तो १५ वर्षीय इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र शिकवत होता. एका दिवशी तो मुलगा दोन दिवस शिकवणीला गैरहजर राहिला म्हणून शिक्षकाने त्याला वर्गातच जोरजोरात कानशिलात लगावल्या. इतकं की त्याच्या कानाच्या पडद्यालाही इजा झाली आणि रक्तस्राव सुरू झाला.
विद्यार्थ्याने ममतम वडील तेजस भट्ट यांना परीक्षा फॉर्म आणण्यासाठी बोलावले होते. ते आणि त्यांच्या पत्नी जेव्हा शिकवणीच्या वर्गाजवळ पोहोचले, तेव्हा त्यांना वर्गातून मारहाणीचे आवाज ऐकू आले. त्यांनी आत धावत जाऊन पाहिले, तेव्हा शिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करीत होता.
जरी शिक्षकाने नंतर माफी मागितली, तरी भट्ट कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तब्बल पाच वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर वडोदरा न्यायालयाने चौहान याला सहा महिने तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नेटिझन्स काय म्हणतात?
संपूर्ण देशभरातून या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी न्यायालयाच्या निर्णयाचं कौतुक केलं, तर काहींनी “हा निर्णय अतिरेक आहे”, असे म्हणत न्यायव्यवस्थेवरच सवाल उपस्थित केला.
एका युजरने लिहिलं, “आमच्या काळात शिक्षकांनी डस्टर फेकले, स्टिकनं मारलं, तरी आम्ही शांत होतो. आज एका चापटीवर तुरुंग? मग आमचे शिक्षक तर जन्मभर दंड भरत राहिले असते.”
आणखी एकाने म्हटले, “शिस्तीच्या नावाखाली मारहाण चुकीची आहे; पण इतकी मोठी शिक्षा म्हणजे कायदाचाच गैरवापर.”
या घटनेने पुन्हा एकदा शिक्षक-विद्यार्थी नात्यातील सीमारेषा स्पष्ट केल्या आहेत. पण, प्रश्न असा आहे की शिक्षणासाठी मार आवश्यक की न्यायासाठी शिक्षा?